पिंपरी : राष्ट्रवादीतील दोन्ही गटांचे म्हणणं ऐकून घेतलं जाईल. त्यानंतरच या प्रकरणाचा निकाल देऊ शकेल. मात्र, या निकालात कुठल्या अदृश्य शक्तीने ढवळाढवळ केली का? हे निकाल लागल्यानंतरच समजू शकेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी केले.
पिंपरी-चिंचवड शहरात आज सकाळी जयंत पाटील आले होते. त्यांनी शहरातील विविध भागातील नेत्यांची भेट घेतली. माजी महापौर आझम पानसरे यांची भेट घेतली. तसेच पाटील यांनी ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सुनावणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर दोन्ही गटांनी दावा केला आहे. त्यावर पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असताना पाटील यांनी भाष्य केले.
पक्ष चोरीला जाऊ नये...
पाटील म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी स्थापन केलेला आहे. कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. राष्ट्रवादी ही शरद पवार यांचीच आहे. अन्य कोणाचीही नाही. हा पक्ष आज होणाऱ्या सुनावणीत कोणतही महत्त्वपूर्ण निर्णय येणार नाही. दोन्ही गटांचे म्हणणं ऐकून घेतलं जाईल. त्यानंतरच सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा निकाल देऊ शकेल. पक्ष चोरीला जाऊ नये, नाहीतर लोकशाही धोक्यात येईल. याबाबत निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतयं याची प्रतिक्षा आहे. ’
टोलवरून टोलवले
टोलमाफीची याचिका मुख्यमंत्र्यांनी मागे घेतली, यावर विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘याबाबत मला फारसे माहिती नाही. त्यांची कोणाशी काय चर्चा झाली. याबाबत मी बोलत नाही. ’’ सेटलमेंट झाली असेल का? असे पत्रकारांनी विचारले असता, त्यावर असे मी म्हणणार नाही.’’ पुन्हा याच प्रश्नांवर पुन्हा छेडले असता, ‘माझा टोलप्रकरणी फार अभ्यास नाही.’’ असे सांगून पाटील यांनी प्रश्नास टोलविले.