पिंपरी : गेल्या अनेक वर्षांपासून एसटीमध्ये खासदार आणि आमदारांसाठी आसन राखीव असते. त्यांना राज्यभर फिरण्यासाठी एसटीतून प्रवासही मोफत असतो. परंतु, भोसरीचे आमदार महेश लांडगे व विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांचा वर्षभरात एसटी कामगार आंदोलनावेळी एकवेळचा एसटी प्रवास केला. या दोघांचा अपवादवगळता पिंपरी-चिंचवड व मावळातील इतर खासदार व आमदारांना एसटीने प्रवास केल्याचे नागरिकांनी पाहिलेले नाही. सध्याचा लोकसभा व विधानसभा मतदारसंघाचा विस्तार पाहता एसटीने प्रवास शक्य नसल्याचा दावाही काही लोकप्रतिनिधींनी केला आहे.
एसटी कर्मचारी आंदोलनावेळी मिळाली संधी...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी अनेक दिवस आंदोलन केले. या आंदोलनाला तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने पाठिंबा दिला होता. या काळात भोसरीचे आमदार महेश लांडगे व तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी एसटी व शिवनेरीने प्रवास केला होता. मात्र, अनेक दिवसांतील या एकमेव प्रवासाची संधी त्यांना मिळाली.
एसटीमध्ये आरक्षण अन् मोफत प्रवास...
पूर्वी एसटी हे प्रवासाचे एकमेव साधन होते. त्यामुळे आपल्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघातून मुंबई व इतर जिल्ह्यात कामकाजासाठी फिरण्यासाठी खासदार व आमदार यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली. त्यासाठी दोन ते चार जागा त्यांच्यासाठी एसटीत आजही राखीव ठेवण्यात येतात. मात्र, वाहतुकीची इतर साधने, महामार्गावरील प्रवास, वेळेचे बंधन या गोष्टीमुळे कोणीही खासदार व आमदार एसटीने प्रवास करताना नागरिकांना दिसत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचा विस्तार रायगड जिल्ह्यातील तीन तालुके, पुण्यातील मावळ तालुका व पिंपरी-चिंचवड असा आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करून नागरिक व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नाही.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ
एसटीने प्रवास करण्याची वेळ येत नाही. पण, एसटी कर्मचारी आंदोलनावेळी पिंपरी ते शिवाजीनगर असा प्रवास करण्याची संधी मिळाली. परंतु, मतदारांच्या कामकाजासाठी एसटीने प्रवास अशक्य वाटतो.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
मावळ विधानसभा मतदारसंघातील कामे करण्यासाठी अनेकदा महामार्गावरून जावे लागते. त्यामुळे एसटीने प्रवास अशक्य आहे. मावळातील मतदारसंघातील दुर्गम वाडी-वस्तीवर जाण्यासाठी खासगी वाहनाचा अधिक वापर होतो.
- सुनील शेळके, आमदार, मावळ
भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा असताना अनेकदा मुंबई प्रवास मी एसटी महामंडळाच्या शिवनेरीने केला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत विधान परिषदेची आमदार झाल्यानंतर एसटीने प्रवास झालेला नाही.
- उमा खापरे, आमदार, विधान परिषद