कामशेत : गेल्या ४५ दिवसांपासून शहरातील बँक आॅफ महाराष्ट्रसमोरील रांगेत काहीच फरक पडला नसून, रांग वाढतच आहे. रांगेत वयोवृद्ध पेन्शनर व महिला खातेदारांची चेंगराचेंगरी व उन्हामुळे मोठी आबाळ होत आहे. अनेकांना चक्कर येणे, महिलांशी अंगलट होणे आदी प्रकार घडत आहेत. तालुक्यातील नाणे, पवन, आंदर व आजूबाजूच्या गावांचे कामशेत मध्यवर्ती शहर असून, येथे तालुका, तसेच शहरातील अनेकांचे खाते विविध बँकांमध्ये आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वच बँकांसमोर एकच गर्दी झाली होती. बँक आॅफ महाराष्ट्र सोडून इतर बँकांमधील नागरिकांची गर्दी ओसरली आहे. कामशेतमधील महाराष्ट्र बँक ही सर्वांत जुनी असल्याने येथे अनेक व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, तसेच पेन्शनर वयोवृद्धांचे मोठ्या संख्येने खाते असून, या बँकेपुढील गर्दी हटण्याचे नाव घेत नाही. बँक आॅफ महाराष्ट्रची येथील शाखा अपुऱ्या जागेत असल्याने खातेदारांची गैरसोय होत आहे. त्यात नोटबंदीच्या काळात सर्वच खातेदारांना बँकेच्या बाहेर रांगेत थांबावे लागत आहे. नोटबंदीच्या ४५ दिवसांनंतही या बँकेची गर्दी कमी होत नसून, सर्वसामान्य खातेदार, वयोवृद्ध पेन्शनर व महिला बँक उघडण्याच्या अगोदर सकाळी सातच्या आधीच नंबर लावून गर्दी करत आहेत. महिला व वृद्धांसाठी वेगळी रांग लावावी. बँकेसमोर लावल्या जाणाऱ्या दुचाकी हटवल्यास नागरिकांना थांबण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होईल. रांगांमध्ये नंबर व इतर कारणांवरून होणारे नागरिकांचे वाद मिटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा, महिलांना धक्का मारणाऱ्या सुरक्षारक्षकावर कारवाई करावी आदी समस्या मांडल्या आहेत. या सर्वांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन बँकेचे व्यवस्थापक नीलकंठ दांडेकर यांनी दिले आहे. (वार्ताहर)
महिला, वृद्धांसाठी हवी वेगळी रांग
By admin | Published: December 24, 2016 12:28 AM