पिंपरी : दाखल गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिघी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निवृत्ती सदाशिव चव्हाण ( वय ५६, रा. पेरायसो सोसायटी, बीआरटी रोड, चौधरी ढाब्यासमोर, मोशी) असे अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
बापू बाळू मांडे (वय ३१, रा. साईकुंज बिल्डिंग, ओमसाई हॉस्पिटल, वाडमुखवाडी, ता. हवेली) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मांडे यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात कलम न वाढवण्यासाठी आणि कलम कमी करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंतर्गत चार हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली. तसेच आरोपीच्या संभाषणाचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. त्यानंतर आळंदी रोडवरील साई मंदिरा जवळ सापळा रचून आरोपीस रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. आरोपी कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.