दिघी : पिंपरी- चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी सर्रास अवैध वृक्षतोड होत आहे. प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचे सांगत वृक्ष प्रेमी, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी वृक्षतोडीला विरोध करीत आहेत. मात्र तरीही वृक्षतोड थांबलेली नाही. त्याच्या निषेधार्थ वृक्षमित्रांनी दिघीत अंत्ययात्रा काढली. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत आंदोलनकर्त्यांनी वृक्षतोड थांबविण्याची मागणी केली.
वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी डॉ. संदीप बहोत, प्रशांत राऊळ, प्रवीण जाधव, सूर्यकांत मुथियान, धनंजय शेंडबाळे, अशोक तनपुरे, संदीप रांगोळे, दिलीप राजपुत, हृषीराज डोंगरे, संदीप पाटील, महेश मैंदनकर, शरद सोनवणे, समीर कालेकर, निकल रेंगे, जालिंदर शिनगारे आदी पर्यावरण प्रेमी व वृक्ष मित्र उपस्थित होते.
विकासकामांच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड शहरात अवैध वृक्षतोडीचे प्रकार सुरू आहेत. परिणामी भारतीय वंशाचे वृक्ष शहरातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणातही अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र त्याच्या पुनर्रोपणाबाबत उदासीनता दिसून येते. त्यामुळे शहरातील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शहरातील वृक्षमित्र, भूगोल फाऊंडेशन, आंघोळीची गोळी, गंधर्व नगरी वृक्षमित्र, देवराई फाऊंडेशन, सावरकर मंडळ, पीसीसीएफ, पर्यावरण प्रकृती विभाग- स्वामी समर्थ केंद्र संस्था या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
एक प्रतिकात्मक कत्तल झालेल्या झाडाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्या झाडाला वृक्ष झेंड्यात ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. नंतर झाडाला सर्व आंदोलकांनी श्रद्धांजली अर्पण केली. या पुढे अनधिकृत वृक्षतोड सहन केली जाणार नाही, असा निर्धार करून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करून वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर झाडाला दफन करण्यात आले. दफन केलेल्या ठिकाणी चिंचेच्या झाडाचे रोपण करण्यात आले.