रहाटणी : प्रभाग क्रमांक २७ हा राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला मानला जात होता. या प्रभागात राष्ट्रवादीचे दोन विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे येथे पुन्हा राष्ट्रवादी बाजी मारेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, हे सर्वच अंदाज खोटे ठरवीत या प्रभागात भाजपाने बाजी मारली आहे. चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, या प्रभागात कमळ फुलले आहे. या प्रभागात सर्वसाधारण गटातून कोण बाजी मारणार, याची उत्सुकता मतदारांना लागली होती. या निवडणुकीत कैलास थोपटे यांची विजयाची हॅट्ट्रिक हुकली, तर चंद्रकांत नखाते यांची पराभवाची हॅट्ट्रिक चुकली. या निवडणुकीत दोन्ही आजी-माजी नागसेवकांची हॅट्ट्रिक चुकली असल्याची चर्चा दिवसभर प्रभागात रंगली होती. ‘अ’गटात भाजपाचे उमेदवार बाबा त्रिभुवन यांना ८,८७८ मते पडली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल भालेराव यांना ५,९५३ मते मिळाली. त्यामुळे २,९२५ मतांनी त्रिभुवन यांचा विजय झाला. शिवसेनेचे उमेदवार युवराज दाखले यांना ३,६७३ मते मिळाली. अपक्ष उमेदवार अरुण चाबुकस्वार यांना १,०७४ मते मिळाली. मनसेचे उमेदवार सचिन कांबळे यांना ६८६ मते मिळाली. अपक्ष उमेदवार संजय गायकवाड यांना ४१४ मते पडली. ‘ब’ गटात भाजपाच्या सविता खुळे यांना ११,८५७ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार अनिता तापकीर यांना ६,४८० मिळाली. ५,३७७ मतांनी भाजपाच्या सविता खुळे विजयी झाल्या. शिवसेनेच्या उमेदवार दीपिका ढगे यांना ३,५६० मते मिळाली. या प्रभागात सुरुवातीपासून भाजपा व राष्ट्रवादीत या जागेसाठी रस्सीखेच होती. ‘क’ गटात भाजपाच्या उमेदवार सुनीता तापकीर यांना ९,११५ मते मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार अनिता तांबे ६,४४९ मते मिळाली. २,६६६ मते मिळवीत सुनीता तापकीर यांनी विजय मिळविला.या प्रभागात तिरंगी लढत पाहावयास मिळत होती. राष्ट्रवादीच्या उमेदवार सविता नखाते यांना ४,९५७ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार वंदना तांबे यांना ८६९ मते मिळाली. ‘ड’ गटात भाजपाचे उमेदवार चंद्रकांत नखाते यांना ८,३९६ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार कैलास थोपटे यांना ६,३२३ मते मिळाली. २०७३ मतांनी चंद्रकांत नखाते यांचा विजय झाला. अपक्ष उमेदवार विनोद तापकीर यांना ४,३१३ मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार उल्हास कोकणे यांना २६८३ मते मिळाली.
हॅट्ट्रिक हुकल्याची रंगली चर्चा
By admin | Published: February 26, 2017 3:41 AM