पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने डावलल्याने भोसरीतील माजी आमदार विलास लांडे दादांची साथ सोडणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचा ताप वाढणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने सर्वप्रथम डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, गेले तीन महिने महायुती ही जागा शिवसेनेला (शिंदेसेना) द्यायची की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला, की भाजपला द्यायची, याबाबत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शिंदेसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपकडून महेश आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची चर्चा होती.
जागा वाटपात राष्ट्रवादीला जागा मिळाल्यास पक्षातील कोणालाही संधी द्यावी, अशी मागणी लांडे यांनी केली होती. तर, लोकसभेच्या निमित्ताने महेश लांडगे आणि विलास लांडे यांचे मनोमिलन झाले होते. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर जागा राष्ट्रवादीला दिली असली, तरी शिवसेनेचे आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने लांडे गट नाराज झाला. तसेच, आढळराव यांच्या पक्ष प्रवेशास लांडे अनुपस्थित होते. त्यामुळे लांडे गट नाराज असल्याचे वृत्त आहे.
दोनदा डावलल्याने लांडे संतप्त!
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून लांडे यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मतदारसंघात पोस्टरबाजी करण्यात आली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवित उमेदवारी दिली. तरीही लांडे यांनी कोल्हे यांचे काम केले. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून लांडे इच्छुक होते. मात्र, त्यांचे सलग दोनदा तिकीट कापल्याने समर्थकांमध्ये नाराजी आहे.
विधानसभेत कोंडी होऊ नये म्हणून!
राष्ट्रवादी फुटली तेव्हा लांडे यांनी अजित पवार यांचा हात धरला होता. त्यांना शिरूर लोकसभेतून उमेदवारी मिळेल याची खात्री होती. मात्र, दुसऱ्यांदा लांडे यांचा अपेक्षाभंग झाला. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. भोसरी विधानसभेत विद्यमान आमदार महेश लांडगे हे आहेत. त्यामुळे महायुतीकडून लांडे यांना संधी नाही. त्यामुळे ते साहेब गटात जाऊ शकतात. लांडे यांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी स्नेह आहे. तसेच, लांडे यांच्या देव्हाऱ्यात शरद पवार यांचे छायाचित्र आहे. त्यामुळे उमेदवारी डावललेले लांडे काय निर्णय घेणार? याबाबत उत्सुकता लागली आहे. दादांची साथ सोडून साहेबांचा हात धरणार असल्याची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात रंगली आहे. दरम्यान, याबाबत अधिकृतपणे दुजोरा मिळू शकला नाही.