पिंपरी : कोरोनाग्रस्त रुग्ण आढलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला जातो. या भागातील नागरिकांना महापालिकेने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करावे. अन्यथा तेथे उद्रेक होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीतर्फे करण्यात आली आहे. युवक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले आहे. पुणे महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे १२ वस्तूंच्या ७० हजार किटचे वाटप होत आहे. पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे आवश्यक आहे. शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर सील केलेला असून काही परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेले आहेत. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडत आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संतप्त झालेले हे नागरिक रस्त्यावर उतरण्याचे प्रकार घडत आहेत. यातून आणखीनच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिकांकडून प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जाईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करा; वंचित बहुजन युवक आघाडीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 6:39 PM
पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे आवश्यक
ठळक मुद्देकोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर सील केलेला असून काही परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर