पिंपरी - दिवाळीच्या सणाला नवीन वस्तूची खरेदी शुभ मानली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकीचा दसऱ्याचा एक मुहूूर्त नुकताच झाला. त्या वेळी खरेदीची सुरुवात झाल्यानंतर दिवाळीत दुचाकी खरेदी करणा-या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली असून, सण-उत्सव काळातील दुचाकी विक्रीतून होणारी आर्थिक उलाढालसुद्धा वाढली आहे. सुटीमुळे आरटीओत वाहन नोंदणीस विलंब होत असला, तरी मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी दुचाकींचे बुकिंग करून ठेवले आहे. उद्योगनगरीत ही उलाढाल अंदाजे १२ कोटींच्या घरात पोहोचली आहे.शहरातील विविध वितरकांकडे चार हजार दुचाकींचे बुकिंग दसºयापर्यंत झाले होते. ज्यांना दसºयाच्या मुहूर्तावर खरेदी करणे शक्य झाले नाही, त्यांनी दिवाळीचा मुहूर्त गाठण्यासाठी धावपळ केली. दसºयापासून वितरकांकडे ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दुचाकीआणि चारचाकी वाहनांच्या शहरातील विविध शोरूममध्ये दिवसाकाठी पाचशेहून अधिक ग्राहक भेट देत आहेत. चारचाकी वाहनखरेदीच्या तुलनेत दुचाकी वाहनखरेदीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. दसºयापर्यंत तीन हजारांहून अधिक दुचाकींचे बुकिंग झाले होते. त्यात आणखी दोन हजार ग्राहकांची भर पडली आहे.दसºयाच्या मुहूर्तामुळे सुमारे सहा कोटींची खरेदी-विक्रीचीआर्थिक उलाढाल झाली असल्याचे वितरकांनी सांगितले होते. बुकिंग केल्यानंतर तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा, तसेच आकर्षक सवलत योजना यामुळे ग्राहक दुचाकी खरेदीस प्राधान्य देत आहे. दसरा ते दिवाळी या दोन प्रमुख मुहूर्तामध्ये दुचाकी खरेदीची उलाढाल दुप्पट झाली आहे.तरुणाईमध्ये बुलेटची क्रेझइतरांपेक्षा हटके आणि रुबाबदार वाटावे या उद्देशाने तरुणाईमध्ये बुलेटची क्रेझ आहे. दिवाळीत बुलेट खरेदी करण्यासाठी तरुणांनी अगोदरच बुकिंग करून ठेवले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी घरी आणण्याची त्यांची लगबग सुरू आहे. बिगरगिअरच्या दुचाकी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल आहे. महिला, महाविद्यालयीन मुले, मुली सहज चालवू शकतील, अशा बिगरगिअरच्या दुचाकी खरेदी करण्यास ग्राहकांची अधिक पसंती आहे. दिवाळी भेट म्हणून पालक मुलींसाठी बिगरगिअरच्या दुचाकी घेऊन देत आहेत, तर मुलांसाठी बुलेट खरेदी केल्या जात आहेत.तरुणाईला अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दुचाकींचे आकर्षण आहे. नवीन, तसेच हटके मॉडेलच्या शोधात असलेल्या तरुण ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नव्या मॉडेलमधील दुचाकी शोरूमध्ये आल्या आहेत. ही दुचाकी कशी असेल, याबद्दलची उत्सुकता तरुणाईमध्ये निर्माण झाली आहे. या नव्या श्रेणीतील दुचाकींच्या बुकिंगसाठीही वितरकांकडे विचारणा होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली असून, दुचाकी विक्री व्यवसाय दहा टक्क्यांनी वाढला आहे. - निक्की सेहगल, संचालक, सेहगल आॅटो रायडर, चिंचवड
दिवाळीचा मुहूर्त : गतवर्षीच्या तुलनेत दुचाकी खरेदीत १० टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 1:55 AM