पिंपरी : पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी-चिंचवड पोलिस दल सक्षम आहेच. त्यांना आवश्यक अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी निधी दिला पाहिजे. तसेच पोलिसांच्या चांगल्या कामाचेही कौतुक झाले पाहिजे. तेही माणूसच आहेत. त्यांचा सन्मान, सत्कार झाल्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे पत्रकार संघातर्फे आकुर्डी प्राधिकरण येथील पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. त्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयुक्त चौबे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये सोमवारी हा कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पीएमआरडीएचे महानियोजनकार विवेक खरवडकर, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखले पाहिजेत. दामिनी पथक अतिशय सक्षम आहे. या पथकाला आणखी अधिकार, दुचाकी, चारचाकी वाहने द्यावीत. या दोन गोष्टीवर लक्ष द्यावे. पोलिसांना चांगले म्हणणे, त्यांचा सत्कार करणे हे फार कमी असते. पोलिसांचा सत्कार करून त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तेही माणूसच आहेत. त्यांची स्तुती केली पाहिजे. त्यामुळे त्यांचा हौसला वाढेल. पोलीस आयुक्त चौबे यांची २६ वर्षे सेवा झाली. पुढील सेवेसाठी शुभेच्छा आणि पोलीस आयुक्त दोन वर्षे येथेच राहतील, असेही पाटील म्हणाले.
कारवाईत हगयक करू नका
पोलिसांची परिणामकारता वाढविण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यासाठी ४० कोटी नियोजन समितीकडून उपलब्ध करून दिले. उर्वरित ६० कोटी देखील उपलब्ध करून देण्यात येतील. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ड्रग्जचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी. त्यात कोणतीही हयगय करू नये, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिली.