स्मार्ट सिटी योजनेचे सर्व निकष पूर्ण करूनही डावलले गेले. यात राजकारण झाले असावे, हे मी सांगण्याची गरज नाही. स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये असतानाही पिंपरी-चिंचवड शहरास डावलले गेले, हे सत्य आहे. विकासात राजकारण आणू नये, विकासाचे राजकारण केले जावे, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले.महापौर म्हणाल्या, ‘‘पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. पुण्यापेक्षाही आपल्या शहराची गती अधिक आहे. येथे नियोजनबद्धपणे विकास झाला, हे सत्य नाकारता येणार नाही. या शहरास केंद्र शासनाचा बेस्ट सिटी पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, ई-गव्हर्नन्स आदी विविध पुरस्कार महापालिकेला मिळाले आहेत. येथील विकास डोळ्यांनी दिसणारा आहे. त्यामुळे कोणी टीका करीत असेल, तर करू द्या. केंद्र शासनाच्या वतीने स्मार्ट सिटी योजना जाहीर झाली. त्यानुसार राज्यातील शहरांची गुणात्मक स्पर्धा घेण्यात आली. त्यात आपल्या महापालिकेचा पाचवा क्रमांक होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी यादी जाहीर केली, त्यात आपल्या शहराचा समावेश होता. त्या वेळी आम्ही सरकारचे स्वागत केले होते. दोन्ही शहरांचाही वेगवेगळा विचार व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सत्तारूढ पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दोन्ही शहरांचा स्वतंत्र विचार करावा, अशी मागणी केली होती. मात्र, काल केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत आपले नाव नाही. गुणात्मक पातळीवर यशस्वी होऊनही डावलले गेले. यात राजकारण झाले आहे, असेच म्हणावे लागेल. हा महापालिकेवरील अन्याय नाही, तर शहरात राहणाऱ्या तमाम नागरिकांवरील अन्याय आहे.’’राज्य सरकारमुळेच आपली संधी हकुली आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, ‘‘गुण मिळवून, परीक्षेत पास होऊनही स्मार्ट सिटीत समावेश झाला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्य सरकारच्या चुकीमुळेच आपली संधी हुकली आहे. या विषयी आम्ही पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन दिले आहे. त्यांनीही सकारात्मक भूमिका ठेवली आहे. त्यामुळे न्याय मिळावा, हीच अपेक्षा आहे. विकासात कोणतेही राजकारण केले जाऊ नये, विकासाचे राजकारण केले जावे.’’ स्मार्ट सिटीत डावलल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. पक्षीय राजकारण सुरू झाले आहे, ही बाब चुकीची आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा झालेली चूक कशी सुधारता येईल किंवा आपल्या शहराचा त्या योजनेत कसा समावेश करता येईल, याबाबत विचार करायला हवा.पक्ष, राजकारण, गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. केंद्र व राज्यात सत्ता असणाऱ्या सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार आपल्या शहरात आहेत. सत्ता कोणाची आहे किंवा याचा कोणाला किती फायदा होईल, याची गणिते करत न बसता, टीका करण्यापेक्षा आपण या शहराचे नागरिक आहोत, शहराचा विकास व्हायचा असेल, तर निधी मिळविण्यासाठी स्मार्ट सिटी सहभागासाठी खासदार, आमदारांनीही प्रयत्न करायला हवेत. श्रेयवादाच्या पाठीमागे न लागता शहराचे हित पाहिले जावे. आपण विकासात, प्रगतीत सर्वांच्या पुढे आहोत, त्यामुळे आपला स्मार्ट सिटी योजनेत समावेश व्हायलाच हवा. शहराच्या हितासाठी, महापौर म्हणून मी लोकांच्या बरोबर आहे. सर्वांनी एकजूट करण्याची गरज आहे, असेही धराडे म्हणाल्या.
विकासकामांत राजकारण आणू नका!
By admin | Published: August 31, 2015 4:03 AM