लोकमत न्यूज नेटवर्कशिरगाव : काही झाले तरी आपली शेती विकू नका. शेतात कुंपण दिसले की माझा जीव खालीवर होतो, असे प्रतिपादन आमदार संजय भेगडे यांनी दारुंब्रे येथे केले. दारुंब्रे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार भेगडे बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीविषयक अडचणी समजून घेऊन त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढा आमदारासमोर वाचला. भेगडे म्हणाले की, जर गटागटाने शेती केली तर मोठ्या योजना राबविणे सोपे जाते. दूध संघासारखे प्रकल्प उभा करता येतात, त्यामुळे गट करून शेती करा. पण, कोणत्याही परिस्थितीत शेती विकू नका. कारण आपल्या येणाऱ्या पिढ्या या शेतीवरच अवलंबून असणार आहेत.या संवाद सभेनंतर या सर्व शेतकऱ्यांसोबत उपस्थितांनी चटणी भाकरीचा आस्वाद घेतला. या वेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पंचायत समिती सदस्य निकिता घोटकुले, माजी नगरसेवक गणेश भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, किरण राक्षे, अनंता आंद्रे, भाऊसाहेब ढोरे, अनंता कुडे, अजित आगळे, बाबूलाल गराडे, शिवाजी लोहर, सांगवडेचे श्यामराव राक्षे, शेतकरी मुरलीधर पानमंद, अशोक थोरवे, सूर्यकांत सोरटे, अंकुश सोरटे, हिरामण सोरटे आदी उपस्थित होते.शेततळे, विमा योजना, गट शेती, गटशेतीसाठी बांधावर खत, बी-बियाणे, भूमिहीन शेतकऱ्यांना पेन्शन योजना, सिंचनासाठी अनुदान, महाविद्यालयीन शिक्षण घेण्याऱ्या शेतकरीपुत्रांसाठीच्या योजना आदींची माहिती सांगून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार भेगडे यांनी दिले.एकच रिंगरोड व्हावापवन मावळ भागातून महाराष्ट्र शासन व पीएमआरडीचा स्वतंत्र दोन रिंग रोडचा प्रस्ताव आहे. मावळातील कसदार जमिनीमधून रिंगरोड जाणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार असल्याने एकच रिंग रोड करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात, अशी मागणी आमदार भेगडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. याचा पाठपुरावा मी स्वत: करत असून तुम्ही एकी तोडू नका, असा सल्ला भेगडे यांनी दिला. कासारसाई धरणातील पाणी याच धरणाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनींना मिळावे. याचा वापर दुसऱ्या कामासाठी होऊ नये यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
काही झाले तरी जमीन विकू नका
By admin | Published: May 30, 2017 2:27 AM