पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने खचून जाऊ नका, विधानसभेच्या कामाला लागा , विधानसभेला जास्तीत जास्त नवीन चेहर्यांना संधी दिली जाईल, त्यासाठी आतापासूनच मतदारांच्या घरी पोहचा, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार निवडून यायला हवेत, असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले .
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विभागवार बैठका घेण्यास पवार सुरुवात केली आहे. आज त्यांनी पुण्यातील भोसरीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळ ते बोलत होते. पवार म्हणाले, आतापासूनच मतदारांना घरोघरी जाऊन भेटायला हवं. असं भेटलात, तर ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत.
सध्या मावळ आणि शिरूरमधील विधानसभांमध्ये राष्ट्रवादीची स्थिती फारशी बरी नाही. आगामी निवडणुकीत किमान जागा जरी परत मिळवायच्या असतील तरी पक्षाला कंबर कसावी लागणार आहे. हेच लक्षात घेत पवार यांनी स्वतः लक्ष घालत एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी -चिंचवडमध्ये गतवैभव परत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे.