पिंपरी : बांगलादेशी घुसखोर तसेच रोहिंग्यांचेपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत वास्तव्य असल्याचे आढळून आले. गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करून २९ बांगलादेशी घुसखोर व चार रोहिंग्यांना अटक केली. गेल्या आठवड्यात शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. त्यावेळी त्यांनीही घुसखोर व रोहिंग्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा कारवाईचा वेग वाढवला आहे.आळंदी-मोशी रस्त्यावरील वेदश्री तपोवन येथे गेल्या आठवड्यात संत संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अंमलीपदार्थ, बांगलादेशी घुसखोर व रोहिंग्यांचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संप्रदायातील मान्यवरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत म्हाळुंगे एमआयडीसी, निगडी, भोसरी, पिंपरी, भोसरी एमआयडीसी, सांगवी, दापोडी, चाकण, तळेगाव एमआयडीसी आणि देहूरोड या पोलिस ठाण्यांच्या परिसरात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना अटक केली आहे. सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक करण्यात आले आहेत. भोसरी परिसरात वर्षभरात १२ बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या. हे सर्व बांगलादेशी बनावट कागदपत्रांद्वारे परिसरात राहत होते. आधार कार्ड, पॅन कार्ड यासह इतर कागदपत्र या बांगलादेशींकडून जप्त केली आहेत.दहशतवाद विरोधी शाखेकडून शोधमोहीमपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्तरावर दहशतवाद विरोधी शाखा कार्यरत आहे. या शाखेकडून घुसखोर, रोहिंग्यांच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. संरक्षण विभाग, शासकीय व निमशासकीय आस्थापनांमधील कंत्राटी तसेच इतर कर्मचारी व कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.काय मागणी होती संत संमेलनात‘आजचा तरुण ड्रग्जच्या अधीन होत आहे. त्याचे प्रमाण पंजाबमध्ये अधिक आहे. पंजाब पोखरला आहे. हे ड्रग्जचे लोन महाराष्ट्रात येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? त्यांना बाहेर कोण काढणार. त्यावरही नियंत्रण आणण्याची गरज आहे, अशी अपेक्षा गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे सांगून पोलिसांना सूचनाही केल्या. त्यानंतर पिंपरी - चिंचवडची पोलिस यंत्रणा सतर्क झाली.पोलिसांनी रद्द केले ६२ पासपोर्टपिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये २०२४ या वर्षभरात २९ बांगलादेशी घुसखोरांना आणि चार रोहिंग्यांना पिंपरी - चिंचवड पोलिसांनी अटक केली. या बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा केला. यात गेल्या वर्षभरात ६२ पासपोर्ट रद्द झाले. यासह संबंधित बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्रदेखील रद्द होण्यासाठी पोलिसांनी पाठपुरावा केला.
बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र करणार आहे. एमआयडीसी आणि संत क्षेत्र परिसरातही ही मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. दहशतवादविरोधी पथकासह आता गुन्हे शाखेच्या विविध पथकांनाही विशेष मोहीम राबविण्यास सांगितले आहे. - विनय कुमार चौबे, पाेलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड