नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी/नेहरूनगर : पुणे येथील ससून रुग्णालयाच्या एका डाॅक्टरच्या कारने चौघांना उडवले. पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वल्लभनगर बसस्थानकासमोर सोमवारी (दि. २४) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.
डॉ. पियुष प्रशांत टोणपे (२२, रा. वल्लभ नगर, पिंपरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हनुमंत कालिदास नामदास (५०, रा. नेहरूनगर, पिंपरी), रिता अनिल सुरवसे (२६, रा. पिंपळे गुरव, सांगवी), दीपक हरिभाऊ मोतेवाड (४०, रा. चिखली), नवनाथ काशिनाथ वाडेकर (४१, रा. खेड, पुणे), उमेश केंगार (४०, रा. महात्मा फुले नगर, भोसरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पियुष टोणपे हे पुणे येथील ससून रुग्णालयात इंटर्नशिप करीत आहेत. ते सोमवारी दुपारी पुणे येथून त्यांच्या राहत्या घरी जात होते. त्यावेळी वल्लभनगर बसस्थानका समोर त्यांचा कारवरील ताबा सुटला. यात कारने धडक दिल्याने चौघे जखमी झाले. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रिक्षालाही कारने धडक दिली. ही रिक्षा टपरीला धडकली. टपरीमध्ये काम करणार्या महिलेच्या अंगावर गरम तेल उडाल्याने ती देखील जखमी झाली. कारने धडक दिल्याने तिघे किरकोळ जखमी झाले. तसेच एक जण गंभीर जखमी झाला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर कारचालक डाॅ. पियुष टोणपे हे त्यांच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात घेऊन गेले. डाॅ. पियुष यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. - अशोक कडलग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी