पिंपरी : धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, तसेच रुग्णालयात २४ तास पुरेशा प्रमाणात पोलीस सुरक्षा पुरवावी, रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे त्वरित भरावी, राजकीय व्यक्तींचा रुग्णसेवेत होणारा हस्तक्षेप थांबविणे आदी मागण्यांसाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएमएच) निवासी डॉक्टर गुरुवारी सामूहिक रजेवर गेले. यामुळे रुग्णसेवेवर काहीसा परिणाम झाला.धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर वायसीएमच्या निवासी डॉक्टरांनीदेखील सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातील ४० डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे. महापालिकेचे चव्हाण रुग्णालय साडेसातशे बेडचे असून शहरासह लगतच्या तालुक्यांमधून देखील या रुग्णालयात रुग्ण दाखल होत असतात. गोरगरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय म्हणजे मोठा आधार आहे. मात्र, रुग्णांना सुविधा देणारेच डॉक्टर संपावर गेल्याने रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय होत आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टर सामूहिक रजेवर
By admin | Published: March 24, 2017 4:15 AM