चांदखेड (पुणे) : चांदखेड येथे ओढ्यात भरधाव कार कोसळून झालेल्या अपघातात कारमधील एका डॉक्टरचा मृत्यू झाला. रविवारी (दि.१९) पहाटे हा अपघात घडला. डॉ. सत्यजित अर्जुनराव नवाडे (वय ४२) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, डॉ. नवाडे यांचे नेरे दत्तवाडी येथे माउली हॉस्पिटल आहे. ते रविवारी मध्यरात्री चांदखेड येथून कारने जात होते. चांदखेड येथील ओढ्यात त्यांची कार कोसळली. स्थानिक नागरिकांनी याबाबत शिरगाव परंदवडी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ संस्थेचे नीलेश गराडे, अजय मुऱ्हे, अनिश गराडे, कृष्णा गायकवाड, प्रतीक थोरवे, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, गणेश ढोरे, शिरगाव पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टरच्या साहायाने कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये डॉ. नवाडे अडकले होते. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.