पिंपरी : काळेवाडीतील तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याचे व्हॉट्स अॅपवर व्हायरल होऊन ही बातमी शहरभर पसरली. मागील काही दिवसांत अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटना शहरात घडल्या असल्याने या घटनेने शहरात खळबळ उडाली. पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. शासकीय रुग्णालयाची यंत्रणा खडबडून जागी झाली. वास्तविक वैद्यकीय तपासणीनंतर बलात्काराची घटना घडलीच नाही हे स्पष्ट झाले. केवळ डॉक्टरांच्या चालढकल वृत्तीमुळे आणि गैरसमजातून हा प्रकार घडला असून, मुलीच्या पालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला.
काळेवाडी नढेनगर येथे राहणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीला ताप आल्याने पालकांनी रविवारी रात्री दीडच्या सुमारास उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) नेले. मुलीची मावशी आणि वडील तिला घेऊन रुग्णालयात आले होते. रुग्णालयात रात्रपाळीत काम करीत असलेल्या डॉक्टरांनी तेथील पोलीस चौकीत या प्रकरणाची नोंद घेण्यास सांगितले. गोंधळलेल्या अवस्थेत मध्यरात्री रुग्णालयात आलेल्या वडिलांना मुलीला उपचार मिळावेत, यासाठी तेथील पोलीस चौकीत नोंदणी करणे भाग पडले.
प्राथमिक तपासणी केल्यानंतर या मुलीला पुढील तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रात्रभर रुग्णालयात राहिल्यानंतर सकाळी मुलीला घेऊन पालक पुण्यातील ससून रुग्णालयात गेले. लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही, या संदर्भातील वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हा वेगळाच प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीला घेऊन तिचे वडील थेट काळेवाडीत घरी निघून आले. ससून रुग्णालयात मुलीच्या पुढील तपासण्या होण्याआगोदरच मुलीला घेऊन पालक रुग्णालय सोडून गेल्याचे लक्षात येताच, ससून रुग्णालयात गोंधळ उडाला. गंभीर घटना घडली असावी, असा अंदाज बांधून ससून रुग्णालयाने वाकड पोलिसांना कळविले.
संत तुकारामनगर पोलिसांच्या मदतीने वायसीएममधील पोलिसांनी एमएलसी दाखल केली असल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. रुग्णालयाशी संपर्क साधून वाकड पोलिसांनी मुलीच्या वडिलांचा मोबाइल क्रमांक मिळविला. नेमका काय प्रकार घडला. याची माहिती घेण्यासाठी पोलीस मुलीच्या वडिलांना वारंवार संपर्क साधत होते. मात्र रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी मोबाइल बंद करून घर गाठले. मुलीच्या वडिलांशी संपर्क होत नसल्याने पोलीसही हतबल झाले. दरम्यान, मुलीचे कुटुंबीय मूळ गावी गेल्याची अफवा शहरभर पसरली.
बलात्कार पीडितेवर प्राथमिक उपचार करण्याचे अधिकार महापालिका रुग्णालयास आहेत. मात्र त्यासंबंधीचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नाहीत. जिल्हा शासकीय रुग्णालयांनाच असे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत. बलात्काराचे खटले न्यायालयात चालविले जातात, त्या वेळी या प्रकरणाशी संबंधित पुराव्यासंबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे अधिकार शासकीय रुग्णालयास असतात. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी मुलीला ससून रुग्णालयात नेण्यास वायसीएमच्या डॉक्टरांनी सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी बलात्कार पीडितेवर उपचार करण्यास विलंब केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाइकांनी केला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून काळेवाडीतील मुलीला ससूनला नेण्यास सांगितले.- डॉ. पवन साळवे, वैद्यकीय संचालक