हणमंत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भिशी म्हटले, की पैसा आला. दर महिन्याची भिशी कोणाला लागते याची उत्सुकता असते. परंतु, पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील डॉक्टरांनी अनोखी भिशी सुरू केली आहे. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी दर महिन्याला ‘झाडांची भिशी’ ही संकल्पना राबविली जात आहे.गेल्या दोन वर्षांत या ‘झाडांची भिशी’ संकल्पनेतून सुमारे अडीच हजार झाडांची लागवड व संवर्धन केले आहे. उच्चशिक्षित नागरिक केवळ निसर्ग व पर्यावरणाची हानी होत असल्याचा गप्पा मारतात, असे टोमणे मारले जाते. परंतु, उद्योगनगरीतील फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे (एफपीए) सभासद त्यासाठी अपवाद ठरले आहेत. केवळ पर्यावरणाची काळजी करीत बसण्यापेक्षा संवर्धनासाठी पाऊल उचलण्याच्या उद्देशाने ‘एफपीए’चे १५ डॉक्टर एकत्र आले. आपण आपल्या आर्थिक व व्यावसायिक विकासासाठी नेहमी एकत्र येतो. परंतु, निसर्ग संवर्धनासाठी दर महिन्याला एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणतेही काम करताना आर्थिक बळ गरजेचे असते. त्यातून ‘झाडांची भिशी’ ही संकल्पना पुढे आली. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी झाडांच्या भिशीसाठी २०० रुपये गोळा करण्याचे ठरले. या जमा होणाऱ्या निधीतून झाडांच्या संगोपनाचा खर्च करण्यात येतो. त्यामध्ये देशी झाडांबरोबरच दुर्मिळ औषधी वनस्पतीची लागवड करण्यावर भर देण्यात आला आहे. झाडे दत्तक योजनागतवर्षी ‘एफपीए’च्या सभासदांनी घोरावडेश्वर डोंगरावर अडीच हजारांपेक्षा अधिक देशी रोपांची लागवड केली. मात्र, मानवनिर्मित आगीमुळे काही रोपे जळून गेली. त्यामुळे डॉक्टर मंडळींनी झाडांच्या लागवडीबरोबर त्यांच्या संगोपनावर अधिक भर दिला. त्यासाठी ‘झाडे दत्तक योजना’ सुरू केली आहे. सभासदांनी भिशीच्या रकमेतून लागवड केलेली झाडे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्येक सभासदाकडून झाडांची निगा राखली जाऊ लागली. तसेच, ज्याप्रमाणे घरातील मूल मोठे होताना पाहण्याचा आनंद मिळतो, तसा झाडांचाही आनंद मिळू लागला आहे, असे ‘एफपीए’च्या सभासद डॉ. मनीषा पाटील, डॉ. सारिका भोईर, डॉ. मनीषा दणाणे व डॉ. सुनील उगिले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उद्योगनगरीत पैशाऐवजी ‘झाडांची भिशी’ करणारे डॉक्टर
By admin | Published: June 19, 2017 5:32 AM