पिंपरी : राजकारणाचं दिवाळं निघालंय, समाजकारणाचं वाटोळ झालंय आणि संस्कृतिचा बट्ट्याबोळ झालेल्या काळामध्ये भारताच्या लोकशाहीला आधार वाटावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. आज भारताची लोकशाही फक्त न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे की काय, असा प्रश्नही उपस्थित करत त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर टिप्पणी केली.
ज्येष्ठ कामगार साहित्यिक दादाभाऊ गावडे लिखीत ‘ध्येयवेड्यांची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी पिंपरी येथे झाले. त्यावेळी श्रीपाल सबनीस बोलत होते. सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत अधिकारी चंद्रकांत दळवी यावेळी उपस्थित होते.
श्रीपाल सबनीस म्हणाले, राजकीय पदाधिकाऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचे उमाळे नाटकी असतात. दु:खाला, वेदनेला आणि गरिबिला जात किंवा धर्म नसतो. अशा परिस्थितीत पुढच्या चार पिढ्या बसून खातील इतका पैसा कमावला जातो. पण आपल्या पुढच्या पिढीला आयता पैसा मिळाला तर सावधान, आपल्या बापजाद्यांनी पैसा कसा कमावला याची जाणीव प्रत्येक पिढीला झाली पाहिजे. त्यासाठी ध्येयवेड्या माणसांचे चारित्र्य वाचन केले पाहिजे. अशा चारित्र्यासाठी इमानदारी, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. त्यासाठी आई-वडिलांचे संस्कार महत्त्वाचे आहेत. ज्यांचे गणित बरोबर आहे, त्यांच्या आयुष्याचंही गणित जुळून येते.
चंद्रकांत दळवी म्हणाले, आयुष्याच्या वाटचालील अडथळा निर्माण झाला की माणसे मागे फिरतात. मात्र या परिस्थितीला जे सामोरे जातात ते यशस्वी होतात. गरिबीच्या पलिकडे एक जग आहे. हलाखीचं एक जग आहे. अशा परिस्थितीत ध्येयवेडी माणसं लढा देत पुढे येतात. संधी अनेकांकडे येते. मात्र, ९५ टक्के लोकांना संधी ओळखताच येत नाही. ज्यांना कळते ते संधीचे सोने करतात. शहरांचा विकास होतोय. पिंपरी-चिंचवड शहर हे त्याचे आद्य माॅडेल आहे. मात्र, खेड्यांचा विकास कसा होणार हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी शहरातील लोकांनी गावाकडे जाऊन काम केले पाहिजे, तरच गावांचा चेहरामोहरा बदलेल.
प्रशासकीय अधिकारी करंटे, कलंकित
प्रशासकीय अधिकारी हे करंटे, कलंकित असतात, कुठे ना कुठे काही तरी खोट असते. खेड्यांचा विकास आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी चांगले लाभले पाहिजेत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शुद्धतेचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असे मत श्रीपाल सबनिस यांनी व्यक्त केले.