पिंपरी : निगडी येथील अमरधाम स्मशानभुमीमध्ये कोरोना बाधित अर्धवट जळालेला मृतदेहाचे पाय काही कुत्री खात असल्याचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन कामास लागले आहे. याप्रकरणी व्हिडीओची सत्यता तपासली जात असून काम स्मशानभूमीत करणाºया कामगारांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांवर महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी आठ हजार रूपये खर्च केले जात आहे. निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत मृतदेह अर्धवट जळालेल्या एका व्यक्तीचा पाय कुत्रा खात आहे, असा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. येथील प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. चौकशीची मागणी केली आहे. सोशल मिडीयावर धक्कादायक व्हीडीओ व्हायरल झाल्याने टीका केली जात आहे. दीपक खैरनार म्हणाले, ‘‘दि.०२ जूनला एका अंत्यविधीच्या निमित्ताने निगडी स्मशान भूमीत गेलो होतो. अंत्यविधी उरकल्यानंतर मला त्या ठिकाणी काही कुत्र्यांचा गराडा दिसला. मी त्यांच्या जवळ जाऊन पाहिले असता ते कुत्रे अर्धवट जळालेला मृतदेहाचा पाय खात होते. या संपूर्ण प्रकाराचे मी व्हिडिओ चित्रीकरण करून ठेवलेले आहे.’’
याबाबत महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय म्हणाले, ‘‘निगडीतील प्रकरणाबाबत तक्रार आल्यानंतर तेथील काम करणाºया संस्थेस नोटीस दिली आहे. कोवीड मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. संबंधित दिवशी तक्रार केलेल्या कालावधीत कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीवर अत्यंस्कार झाले नाहीत. संबंधित प्रकरण आणि व्हिडीओची सत्यता तपासली जात आहे. तसेच दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.’’
मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ‘‘सोशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हिडीओ भयानक आहे. कोरोना मृतदेहाबाबत अशा प्रकारे घटना घडणे ही बाब चुकीची आहे. त्याची तपासणी करणे, या प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे. संबंधित प्रकार खरा असेल तर दोषींवर कारवाई करावी.’’