पिंपरी : तडीपार आरोपी नियमाचा भंग करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आला होता. त्याच्याजवळ २० हजार रुपये किमतीचा गांजा होता. या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता आरोपीसोबत असलेल्या त्याच्या साथीदाराने पोलिसाच्या अंगावर कुत्रा सोडला.
कुत्र्याने पोलिसाच्या हाताचा आणि पायाचा चावा घेतला. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री १० च्या सुमारास म्हातोबानगर, वाकड येथे घडली. या प्रकरणी अमली विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप छबू शेलार (वय ४२) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र प्रकाश घाडगे (वय २७) याला अटक केली आहे. तर त्याचा भाऊ सागर प्रकाश घाडगे (दोघे रा. म्हातोबानगर, वाकड) याच्यासह अशोक तुपेरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर याला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तो आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आला होता. त्याच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले होते.
पोलिसांना आरोपी सागरजवळ तब्बल २० हजार २५० रुपये किमतीचा गांजा तसेच ४१ हजार रुपये किमतीचा मोबाईल मिळून आला. त्याने आरोपी अशोक तुपेरे याच्याकडून गांजा आणल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपी सागर याने माझ्या भावाला सोडा, तुमचा काय संबंध, एकेकाला बघून घेतो, असे म्हणत त्याच्याबरोबर असलेल्या कुत्र्यास छू म्हणून पोलिसांच्या अंगावर सोडले. यावेळी फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या पोलीस नाईक संदीप पाटील यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने संदीप पाटील यांच्या हाताला आणि पायाला चावा घेतला. यामध्ये पाटील जखमी झाले. त्यानंतर आरोपी म्हतोबानगर झोपडपट्टीमधून पळून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे.