पिंपरी : अनेक आई वडिलांना परिस्थितीमुळे किंवा त्यावेळी नसलेल्या सोयी-सुविधांमुळे डॉक्टर, इंजिनीअर होता आले नाही. मात्र, आपल्या मुलांने ते स्वप्न पूर्ण करावे अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे त्या मुलांवर अतिरिक्त दबाव टाकला जातो. ज्या विषयामध्ये मुलांची बुद्धी चालत नाही त्यामध्ये त्यांना प्रवेश घेऊन दिला जातो. परिणामी अशी मुले या ओझ्याखाली दबून अयशस्वी होत चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे पालकांनो तुमची अपुरी राहिलेली स्वप्न मुलांवर लादू नका असा सल्ला डॉ. प्रफुल्ल हते यांनी दिला.
चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे शैक्षणिक प्रदर्शनाची शनिवारपासून सुरूवात झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते दुपारी उद्घाटन झाले. त्यानंतर आयोजित सेमिनारमध्ये डॉ. हते बोलत होते. दुपारच्या सत्रामध्ये डॉ. प्रफुल्ल हते यांचे ‘करिअर निवडताना विद्यार्थी व पालकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान झाले. तर त्यानंतर ‘बदलते शैक्षणिक प्रवाह आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर डॉ. मानसी अतितकर व ‘ॲनिमेशन आणि व्हिजुअल इ्फेक्टमधील संधी’ या विषयावर अजय पोपळघाट यांनी मार्गदर्शन केले. तर सायंकाळी डॉ. जितेंद्र भवाळकर हे ‘वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक संधी’ व ब्रिगेडिअर हेमंत महाजन ‘सैन्य दल व पोलिस दलातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनाला शहरातील पालक व विद्यार्थ्यांनी भेट देत आपल्या भविष्याच्या योग्य मार्ग निवडावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बदलत्या प्रवाहानुसार दिशा बदलली पाहिजे : डॉ अतितकर
‘बदलते शैक्षणिक प्रवाह आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर बोलताना डॉ. मानसी अतितकर म्हणाल्या,“ अलीकडे शैक्षणिक पद्धती बदलली आहे. वर्षागणिक काहीतरी नवीन पद्धती येत आहेत. जग बदलत असल्याने त्यानुसार आवश्यक मनुष्यबळाची गरज लागत आहे. ते घडविण्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आपणही बदलत्या प्रवाहानुसार दिशा बदलली पाहिजे.”