वडगाव मावळ : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी चौकशी अंती सत्य बाहेर येईल, असे स्पष्टीकरण आमदार सुनील शेळके यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिले आहे. किशोर आवारे यांच्या कुटुंबीयाच्या तक्रारीनंतर शुक्रवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण सात जणांवर हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी त्यांची बाजू मांडली.
यावर आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. किशोर आवारे यांच्यासोबत राजकारणामध्ये एकत्रितपणे काम केले. आमचे विचाराच्या माध्यमातून मतभेद असतील; पण मनभेद नव्हते. परंतु, काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेला राजकीय वळण देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
मी पोलिस यंत्रणेला पूर्ण सहकार्य करीत आहे. या घटनेची सत्यता समाजापुढे न्यायदेवता आणि पोलिस यंत्रणा आणल्याशिवाय राहणार नाही. बदनाम करून मला जर कोणी अलिप्त करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते मी कदापि सहन करणार नाही. चौकशी सखोल करा, याच्यातून कोण गुन्हेगार आहेत यांचीदेखील चौकशी करा. यामागे कोण राजकारण करतोय त्यांची चौकशी करा. याबाबत मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांची दोन दिवसांत भेट घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.
रविवारी निषेध मोर्चा
मावळचे आमदार सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या चुकीच्या व खोट्या दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ मारुती मंदिर तळेगाव दाभाडे येथून सकाळी ९ वाजता तळेगाव पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.