पिंपरी : दुहेरी खून प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चार आरोपींना अटक झाली, त्यातील एक फरार होता, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्यात प्रत्क्षक्ष सहभाग असलेल्या आरोपीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरेच नाव पोलिसांना दिले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार या खून प्रकरणातील फरार आरोपी नासिर उल नसून दुसराच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीने स्वत:च्या भावाला वाचविण्यासाठी केलेली बनवाबनवीचा प्रयत्न असफल झाला आणि सावन नारायण जाधव (वय २५, रा. हिंजवडी. मूळ रा. सोलापूर) या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले.याप्रकरणी दत्ता भोंडवे, सोनाली जावळे, प्रशांत भोर आणि पवन जाधव या चौघांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला अटक आरोपींच्या सांगण्यावरून नासिर उल हा एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांना भासविण्यात आले. आरोपींकडे नासिर बाबत अधिक चौकशी केली असता, नासीर सध्या पश्चिम बंगाल मध्ये राहतो. तो पुण्यात आलेला नाही. गुन्हा घडला त्यावेळी नेमके कोण होते? नासीर की सावन असे विचारले असता आरोपी पवन जाधव याचा भाऊ सावन उपस्थित होता. मात्र या प्रकरणातून भावाला वगळण्यात यावे, यासाठी पवनने चौकशीत नासीर असे आरोपीचे नाव पोलिसांना सांगावे, असा आग्रह आरोपींकडे धरला होता. त्यामुळे आरोपीबाबत दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे अटक आरोपींनी पोलिसांना सांगितले असल्याचे तपासात उघड झाले.
दुहेरी खून प्रकरणातील आरोपींची बनवाबनवी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 9:09 PM
पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीने स्वत:च्या भावाला वाचविण्यासाठी केलेली बनवाबनवीचा प्रयत्न असफल झाला
ठळक मुद्देफरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात