पिंपरी : स्मार्ट सिटीबाबतच्या निकषामध्ये पिंपरी-चिंचवड शहर बसले नाही. सत्ताधारी राष्ट्रवादीमुळे शहर बकाल झाले आहे. आर्थिक स्थिती डबघाईला आहे. प्रकल्प अपूर्ण आहेत. भौतिक सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीत डावलले असावे. भविष्यकाळात या शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यासंदर्भात प्रयत्न करू, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यक्रमास आले असताना दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्मार्ट सिटीत पिंपरीला का डावलले, एलबीटीचे राजकारण यावर भाष्य केले. दानवे म्हणाले, ‘‘अनेक शहरांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झालेला नाही. येत्या ९ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर आपले शिष्टमंडळ केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना भेटणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला नाही, याला अनेक कारणे आहेत. पायाभूत सुविधांबाबत जे स्मार्ट सिटीचे निकष होते. ते हे शहर पूर्ण करू शकले नाही. केंद्र सरकारने निधी दिलेले अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. बकालपणा आणि नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. त्यामुळे डावलले गेले असावे. यामध्ये राजकारण झालेले नाही. या भागातील भाजपचे पदाधिकारी आणि नेत्यांनी स्मार्ट सिटी समावेशाबाबत आग्रही मागणी केली आहे. त्यामुळे या शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करू. येत्या २०१७ च्या निवडणुकीत महापालिकेत आमची सत्ता असेल आणि हे शहर अधिक स्मार्ट बनविण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करेल.’’ (प्रतिनिधी)
आर्थिक डबघाईमुळे डावलले स्मार्ट सिटीतून
By admin | Published: September 07, 2015 4:28 AM