कामशेत : कडधे गावामध्ये पोल्ट्रीच्या व्यवसायासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन अजून एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून चिडून वेळोवेळी उपाशी ठेऊन शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानी मारहाण, शारीरिक व मानसिक जाचहात करून छळ केल्याप्रकरणी सासु नवरा व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तृप्ती कार्तिक दळवी (वय २३ रा. कडधे ता. मावळ जि पुणे, सध्या रा. वाशी कोपरखैरणे, नवी मुंबई ) या महिलेने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी तृप्ती यांचे पती कार्तिक सुनील दळवी, सासु सुनीता सुनील दळवी ( दोघे रा. कडधे ता. मावळ जि पुणे) व नणंद गौरी समीर दाभाडे ( रा. तळेगाव दाभाडे ता मावळ जि पुणे ) यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ( छळ - दि. १८ मे २०१७ नंतर एक महिन्यानंतर ते २९ एप्रिल २०१८ पर्यंत ) तृप्ती कार्तिक दळवी यांचे सुमारे दीड वर्षांपूर्वी ( दि. १८ मे २०१७ ) रोजी कडधे येथील कार्तिक सुनील दळवी यांच्या बरोबर कामशेत जवळील मंगल कार्यालयात लग्न झाले. नवरा मुलगा हा नोकरीस असल्याचे सांगण्यात आले मात्र त्याला काही कामधंदा नसल्याने लग्न झाल्यानंतर काही दिवसातच तृप्ती यांच्याकडे माहेरहून पोल्ट्री व्यवसायासाठी पैसे घेऊन येण्याचा पती व सासूने तगादा लावला. त्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
सुरुवातीला तृप्तीच्या घरच्यांनी वडील शांताराम पानमंद यांनी उसनेपासने करीत २ लाख रुपये तृप्तीच्या माहेर कडी मंडळीना दिले. त्यामुळे तृप्तीला पती व सासूने काही दिवस व्यवस्थित नांदवले. मात्र त्यानंतर २९ एप्रिल २०१८ रोजी पुन्हा माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली असता माझ्या घरच्यांची परिस्थिती नाही असे तृप्ती यांनी सांगितले असता सासु सुनीता व नवरा कार्तिक यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यानी मारहाण केली व पैसे न घेता आलीस तर जीवे मारण्याची धमकी देऊन घरातुन हाकलुन दिले. तिच्या जवळील सर्व दागिने काढून घेतले. यावर माहेरी राहायला गेलेल्या तृप्तीला नांदवण्यासाठी तिच्या घरच्यांनी सासर कडील लोकांबरोबर वेळोवेळी सामंजस्याने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कामशेत मध्ये बैठकी घेण्यात आल्या. परंतु सासरकडील मंडळीकडून तृप्तीला घरी नंदाण्यास नकार देण्यात आला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक महेंद्र वाळुंजकर करीत आहे.