पिंपरी : शहरातील भाजपमधील नाराजांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाणेर येथे गुरुवारी रात्री बैठक घेतली. लोकसभा निवडणूक आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नगरसेवकांना संघटनात्मक जबाबदारी व कोअर समितीत स्थान द्या, माजी नगरसेवकांना प्रभागाची जबाबदारी द्या, अशा सूचना शहर समितीला देण्यात आल्या. नाराज गटाचे म्हणणे एकूण घेतले आणि नाराजी दूर केली.
भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची मुदत संपल्याने या पदासाठी अनेक नेते इच्छुक होते. अध्यक्षपदी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांची वर्णी लागताच एक गट नाराज झाला होता. त्यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते यांनी तशी नाराजी व्यक्त केली होती. १४ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र देऊन राजकारणातील घराणेशाहीला विरोध केला होता.
या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बाणेर येथे नाराज नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बावनकुळे यांनी नाराजांचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीस शहराध्यक्ष शंकर जगताप, स्थायी समितीचे माजी सदस्य शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, मोरेश्वर शेडगे, मोना कुलकर्णी, सुनीता तापकीर आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बावनकुळे यांनी प्रत्येक नगरसेवकांशी वैयक्तिक संवाद साधत म्हणणे ऐकून घेतले.
शहराध्यक्ष पालक असतो. सर्वांना एकत्र घेऊन संघटना वाढविण्याची माझी भूमिका आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यावर भर दिला आहे. काही सदस्यांची नाराजी होती. त्यांच्याशी प्रदेशाध्यक्षांनी संवाद साधला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक बांधणीस प्राधान्य दिले जाणार आहे. -शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप.
शहराध्यक्ष निवडीत आणि पक्ष संघटनेत डावलले जात आहे, अशी अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची भावना झाली होती. मात्र प्रदेशाध्यक्षांनी सर्व सदस्यांची बैठक घेतली. नाराजांची समजूत काढली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हस्तक्षेप केल्यामुळे सर्व नगरसेवकांनी त्यांच्या शब्दास मान देण्याचे ठरविले आहे. प्रमुख नगरसेवकांना संघटनात्मक जबाबदारी व कोअर समितीत स्थान देण्याच्या सूचना दिल्या आहेत. - शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक