पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठा ४८ टक्के झाल्याने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात सुरू केली आहे. मात्र, शहरातील विविध भागांत महापालिका, प्राधिकरण, म्हाडा, रेडझोनच्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामे राजरोस सुरू आहेत. नागरिकांना एकवेळ पुरसे पाणी मिळत नसताना अनधिकृत बांधकामांना पिण्याचे पाणी सर्रास वापरले जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईस सामारे जावे लागत आहे.मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पवना धरण हे साडेदहा टीएमसीचे आहे़ उद्योगनगरी आणि काही गावांसाठी ५.८ टीएमसी पाण्याचे आरक्षण आहे. उर्वरित आरक्षण हे शेती आणि गावांच्या पाणीयोजनांसाठी आहे. महापालिका दिवसाला धरणातून ४८० एमएलडी पाणी उपसा करते. परंतु, पाण्याचा जपून वापर करण्याकरिता रावेत बंधाऱ्यातून दैनंदिन ४४० दक्षलक्ष लिटर एवढ्याच पाण्याचा उपसा करण्याबाबत जलसंपदा विभागाने कळविले. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.पवना धरणात सध्याला केवळ ४८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात ५८ टक्के साठा होता. म्हणजेच दहा टक्के पाणीसाठा जास्त होता. पाणीपातळी कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात एक मार्चपासून पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. आठवड्यातून एक दिवस वेगवेगळ््या विभागनिहाय पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले होते. मात्र, दोन आठवडे होऊनही पाण्याचे वेळापत्रक सुरळीत झालेले नाही.अपव्यय : वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापरशहरात पिण्याचे पाणी घरातील फरशा, वाहने धुण्यासाठी वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच बागीचालाही पिण्याचे पाणी घातले जाते. पिण्याच्या पाण्याचा वाहने धुण्यासाठी वापर करू नये. घरातील, इमारतींमधील, नळांमधून, पाईप्समधून होणारी पाणीगळती बंद करावी. टाक्यांमधून पाणी ओव्हरफ्लो होऊ देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणीगळती आणि पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे.पावसाची अनिश्चितता, धरणातील वेगाने कमी होत असलेला पाणीपुरवठा याचा विचार करता पाणीकपात सुरू केली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. गळती रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच पाणी चोरी करण्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पिण्याचे पाणी कोणी बांधकामांना वापरत असेल तर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी अनधिकृत बांधकामांना वापरू नये. - प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता,पाणीपुरवठा विभागअनधिकृत बांधकामे जोमातशहरात महापालिका, प्राधिकरण, म्हाडा, रेडझोन असे क्षेत्र आहे. त्या भागांमध्ये अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. या बांधकामांना चोरून नळजोड घेऊन पाणी वापरले जात आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. रावेत, किवळे, चिंचवड, थेरगाव, भोसरी, दिघी, चिखली, चºहोली, रुपीनगर, तळवडे, काळेवाडी, रहाटणी, ताथवडे, पुनावळे, किवळे, पिंपरी, आकुर्डी, मोहननगर, संत तुकारामनगर, पिंपळे निलख, सांगवी , नवीसांगवी, दापोडी, फुगेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे बांधकामे सुरू आहेत. केवळ नोटीस देण्यापलीकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लोक काहीही कारवाई करीत नाहीत. नवीन बांधकामांना अनधिकृतपणे पाणी वापरले जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांना टॅप मारून पाणी चोरले जात आहे.पाऊस लांबल्यावर कपात वाढणारउन्हाळ्यामध्ये वहनतूट, बाष्पीभवन, सिंचन, घरगुती वापर इत्यादीसाठी पाण्याच्या वापरामध्ये वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पाणी वापरात कपात करण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करण्याचे कळविले आहे. त्यानुसार शहराच्या पाणी वापरामध्ये कपात करण्यासाठी सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीबंद करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार उद्यापासून वेगवेगळ््या विभागनिहाय एक दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. पाऊस लांबल्यास पाणीकपातीत वाढ करावी लागणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे मत आहे.
पिण्याचे पाणी अनधिकृत बांधकामांना; टंचाईमुळे कपातीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 3:28 AM