पिंपरी : पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात देखील होत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत काही ठिकाणचे खड्डे बुजविले. मात्र खड्डे मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांची अडचण झाली. त्यामुळे तत्काळ खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रशासनाकडे करण्यात सादर करण्यात आले आहे. त्यानुसार तात्पुरती उपाययोजना म्हणून काही ठिकाणी खडी, मुरूम टाकण्यात आला आहे. मात्र, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्हा मार्ग देखील आहेत. पावसामुळे या रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. त्याबाबत पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध आस्थापनांकडे निवेदन दिले आहे. संबंधित आस्थापनेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. यापूर्वीही पोलिसांनी रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण, साईडपट्ट्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
पावसामुळे खड्डेमय झालेले वाहतूक विभागनिहाय रस्ते
हिंजवडी १) कस्तुरी चौक ते हिंजवडी गावठाण मार्गे छत्रपती शिवाजीमहाराज चौक२) बेंगळुर -मुंबई महामार्गाचा सेवारस्ता
वाकड १) वाकडनाका ते कस्पटे चौक२) बिर्ला हाॅस्पिटल ते विनोदे काॅर्नर चौक३) काळेवाडी फाटा ते पुनावळे पूल
चिंचवड१) अहिंसा चौक, चिंचवड स्टेशन२) वेताळनगर झोपडपट्टी३) चिंचवड स्टेशन पूल
देहूरोड१) मुकाई चौक ते विकासनगर रस्ता२) पुनावळे पूल ते साईनगर रस्ता
भोसरी१) सद्गुरुनगर चौक ते मोशी टोलनाका
पिंपरी१) पुणे-मुंबई महामार्गाचा सेवा रस्ता२) पिंपरीगावातील अंतर्गत रस्ते३) पिंपरी कॅम्प, बाजारपेठ४) जमतानी चौक, जिजामाता चौक५) मोरवाडी६) मोहननगर७) वल्लभनगर८) संत तुकाराम नगर९) नेहरुनगर१०) केएसबी चौक परिसरातील रस्ते
निगडी१) त्रिवेणी नगर चौक२) के. सदन चौक
चाकण व महाळुंगे१) तळेगाव-चाकण- शिक्रापूर महामार्ग२) एमआयडीसीतील अंतर्गत रस्त३) महाळुंगे पोलीस चौकी शेजारील अरुंद पूल४) महाळुंगे गाव कमान परिसर५) खालुंब्रे६) सारा सिटी चौक परिसर७) वाघजाईनगर८) एचपी चौक परिसर
तात्पुरती डागडुजीपावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने काही ठिकाणी पोलिसांनी मुरुम, माती टाकून खड्डे बुजविले. मात्र, पावसामुळे मुरूम आणि माती वाहून जाऊन पुन्हा खड्डे होत आहेत. या पोलिसांनी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार प्रशासनाने काही ठिकाणी तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजवले आहेत.
मेट्रो प्रकल्प, खोदकामामुळे रस्त्यांची ‘वाट’हिंजवडी आणि मोरवाडी येथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले असूनवाहतुकीला त्याचा अडथळा होत आहे. तसेच शहरांतर्गत काही रस्त्यांवर देखील खोदकाम केलेले आहे. त्यात पावसाची भर पडली असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
खड्डे व रस्त्यांची दुरवस्था याबाबत संबंधित विभागांना सूचित केलेले आहे. वाहतूक पोलिसांनी काही ठिकाणचे खड्डे बुजवले. पावसाने उघडीप दिल्यानंतर खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करण्यात येईल, असे संबंधित विभागांकडून सांगण्यात आले आहे. अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी.- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड