नारायण बडगुजर-
पिंपरी : जिल्हाबंदी असतानाही प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या १३ रस्त्यांवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत नाकाबंदी देखील आहे. पुणे जिल्ह्याचा सीमावर्ती भाग पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेर आहे. त्यामुळे या चेकपोस्टवर ई- पासबाबत विचारणा केली जात नाही. मात्र वाहनचालकांची कसून तपासणी केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग, मुंबई-बेंगळुरू महामार्ग, तळेगाव-चाकण तसेच पुणे-नाशिक महामार्ग जातात. तसेच जिल्ह्याच्या इतर भागातून पिंपरी-चिंचवडकडे येणाऱ्या काही प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. अशा १३ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत ३६ ठिकाणी नाकाबंदी आहे. प्रवासाचे कारण काय, ओळखपत्र आहे का, कोरोनाची अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली आहे का, अशी विचारणा बंदोबस्तावरील पोलिसांकडून वाहनचालकांकडे केली जात आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनचालक, कामावर जाणाऱ्या कामगार, कर्मचारी, डॅाक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्या ओळखपत्राची तपासणी केली जाते.
प्लाझ्मा घेऊन जातोय...रक्तदान करायचे आहे, औषधे घ्यायला जातोय, अशी विविध कारणे वाहनचालकांकडून सांगितली जातात. सांगवी येथे नाकाबंदीत एका चारचाकी वाहनाला अडवले. आम्ही प्लाझ्मा घेऊन जातोय, असे वाहनातील तिघांनी पोलिसांनी सांगितले. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांपैकी कोणीही त्यांच्यासोबत नव्हते. तसेच डॉक्टरांची चिठ्ठी देखील नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली. त्यानंतर सांगवी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर यांनी त्यांच्याकडे चाैकशी केली असता, त्यांच्यातील एक जण डॉक्टर असल्याचे समोर आले. त्यांची कागदपत्र तपासून त्यांना लागलीच सोडण्यात आले.
४९ अधिकारी, २९४ कर्मचारीअंतर्गत भागातील नाकाबंदीची ३६ ठिकाणे तसेच १३ चेकपोस्ट अशा ४९ ठिकाणी बंदाेबस्त आहे. प्रत्येक पॉईंटसाठी एक अधिकारी, वाहतूक विभागाचे चार व स्थानिक पोलीस ठाण्यांकडीत दोन कर्मचारी अशा सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार ४९ अधिकारी व २९४ कर्मचारी अशा एकूण ३४३ पोलिसांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सांगवी फाट्यावर कसून चौकशीपुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणाऱ्या सांगवी फाटा येथे पोलिसांकडून वाहनांची तपासणी होत आहे. बॅरेकेडिंग करून भर उन्हात पोलिसांकडून वाहन चालकांकडे चौकशी केली जाते. तसेच सबळ कागदपत्र किंवा विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाई करताना पोलीस.
सृष्टी चौक, पिंपळे गुरवपिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. अंतर्गत भागात नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण घराबाहेर पडतात. अशा नागरिकांची सृष्टी चौकात तपासणी करताना पोलीस. विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. कोरोना महामारीतही काही दुचाकीस्वार ट्रिपलसीट जाऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात.
हॅरिस ब्रिज, दापोडीपुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे हॅरिस ब्रिजजवल बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. खडकीकडून दापोडीकडे येणाऱ्या वाहनचालकांची येथे तपासणी होते. मात्र दुपारी येथे पोलीस नसल्याने वाहनचालक बिनदिक्कत जात हाेते. बंदोबस्तावरील पोलीस जेवणासाठी गेले असल्याचे तेथील एका कर्मचाऱ्याने सांगितले.