पिंपरी : संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोमवारपासून (दि. २०) सुरू होत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त तळवडे वाहतूक विभागात रविवारपासून (दि. १९) बुधवारपर्यंत (दि. २२) वाहतुकीत बदल केलेल आहेत. त्यानुसार देहुगाव कमान (जुना मुंबई-पुणे महामार्ग) ते परंडवाल चौक (देहुगाव) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. त्यासाठी पर्यायी रस्ता - भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅन बे चोक ते खंडेलवाल चौक, देहुगाव असा राहील. तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक ते महिंद्रा सर्कल हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. त्यासाठी पर्यायी रस्ता - तळवडे गावठाण - चिखली ते डायमंड चौक ते मोईगावमार्गे निघोजे एमआयडीसीकडे वाहने जातील. तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहुफाटा येथुन देहुगाव जाणाऱ्या रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहतुक बंद राहील. पर्यायी रस्ता - एचपी, चौक मार्गे इच्छित स्थळी वाहने जातील. परंडवाल चौक ते देहू कमान चौक ते खंडेलवाल चौक हा रस्ता व्हीआयपी व्यक्तींच्या वाहनां व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. देहूकमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पार्किंग व्यवस्था
१) इंदाेरीकडून येणाऱ्या वाहनांसाठी बायपास रोडवर देहुगाव गायरान मैदान, ओम डेव्हलपर्स प्लाॅट येथे पार्किंग राहील.
२) तळवडे कॅनबे चाैकाकडून कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी खंडेलवाल चौकाच्या रस्त्यावर दिगंबर कन्स्ट्रक्शन प्लाॅट येथे पार्किंग राहील
देहुराेड आणि निगडी वाहतूक विभागांतर्गत सोमवार (दि. २०) ते बुधवारपर्यंत (दि. २२) सेंट्रल चौक ते देहूकमानकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग - सेंट्रल चौक, मामुर्डी, किवळे, भुमकर चौक, डांगे चोक मार्गे इच्छित स्थळी वाहने जातील. भक्ती-शक्ती चौक येथे मुंबईकडून येणारी वाहतूक जुन्या मुंबई -पुणे महामार्गाने जाण्यास मनाई आहे. पर्यायी मार्ग - काचघर चौकाकडून बिजलीनगर चौक मार्गे डांगे चौकातून पुण्याकडे व इतरत्र जातील.