तळवडे : येथील सॉफ्टवेअर चौकात एम.आय.डी.सी. च्या वतीने कमानीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी सॉफ्टवेअर चौकात खोदकाम करण्यात आले आहे. परंतु वाहतूक आणि पादचारी यांचा कोणताही विचार करण्यात आला नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
तळवडे येथे सॉफ्टवेअर चौकात तळवडे आय.टी.पार्क यांच्या वतीने स्वागत कमानीचे काम सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी सिमेंट काँक्रिटची कमान उभारली जाणार असून, रस्त्याच्या मधोमध आणि दोन्ही बाजूंना पादचारी मार्गावर मोठमोठे खड्डे खोदले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून केवळ दोन फलक लावले आहेत, परंतु रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी असलेले पदपथ खोदले आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमध मोठा मुरुमाचा ढीग लावला आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून, पादचाºयांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. सदर रस्त्यावरून कित्येक सॉफ्टवेअर अभियंते व इतर प्रवासी पायी प्रवास करीत असतात. रात्रीच्या सुमारास येथील पथदिवे बंद असतात, तर सुरू असलेल्या दिव्यांचा पुरेसा प्रकाश पडत नाही. यामुळे येथे केलेल्या खोदकामामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.कितीतरी आयटी अभियंते येथून पायी प्रवास करीत असतात. संपूर्ण पादचारी मार्गावर खड्डे केले आहेत. त्यावर मुरूम पसरलेला असल्यामुळे पादचाºयांना चालण्यासाठी मार्ग शिल्लक नाही. दुचाकी घसरत आहेत. या ठिकाणी देखरेख करण्यासाठी अधिकारी नाहीत. कोणाला कामासंबंधी माहिती विचारल्यास सांगता येत नाही. काम सुरु करताना सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना केल्या नसून शून्य व्यवस्थापन केलेल्या परिस्थितीत काम सुरु आहे.- अतुल जोशी, सॉफ्टवेअर अभियंता