बोपखेल : येथील दिघी पारेषण विभागाने भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी बोपखेल फाट्याहून गणेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदाई केली आहे. त्यामुळे या रस्त्याची एकेरी वाहतूक झाली आहे. संध्याकाळी चाकरमान्यांची घरी जाण्याची घाई असतेअशातच वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
बोपखेलला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने महावितरण कंपनीने हे काम दिवस रात्र करून पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. एक तासाहून अधिक वेळ वाहतूककोंडीमध्ये अडकलेल्या व वाहनांच्या लांबच लांब रांगा त्यामुळे वाहनचालक व प्रवासी यांनी मन:स्ताप व्यक्त केला.गेल्या आठवड्यात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. आठवडा पूर्ण होतो न होतो तोच पुन्हा हा रस्ता खोदण्यात आला आहे. बोपखेल ते बोपखेल फाटा हा एकमेव रस्ता रहदारीसाठी आहे. हा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहतुकीसाठी अपुरा आहे. त्यात अशाप्रकारे खोदकाम सुरू झाल्याने वाहतूककोंडीची समस्येला बोपखेल येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गेली दोन दिवस झाले या कामास सुरुवात करण्यात आली आहे. खोदकाम करून वीजवाहिनी जोडण्यास आठ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बोपखेल, गणेशनगर येथील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.