तळेगाव दाभाडे : शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी(दि.२२) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील नवीन समर्थ विद्यालयाजवळील विहिरीत घडली.प्रज्वल प्रशांत भालेराव(वय १६,रा. गवत बाजार, हरनेश्वरवाडी, तळेगाव स्टेशन,ता. मावळ)असे विहिरीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.या संदर्भात प्रदोष नंदकुमार मोरे(वय ४२,रा. खांडगे कॉलनी, तळेगाव स्टेशन,ता. मावळ)यांनी येथील पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.प्रज्वल भालेराव हा हुशार व गुणी विद्यार्थी होता. तो तळेगाव स्टेशन येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता १०वीच्या वर्गात शिकत होता.त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.त्याच्या या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रज्वल भालेराव आणि त्याचे काही मित्र पोहण्यासाठी शुक्रवारी दुपारी नवीन समर्थ विद्यालयाजवळील विहिरीतील पाण्यात उतरले. मात्र पोहत असताना दुर्दैवाने प्रज्वल भालेराव पाण्यात बुडाला.त्याचवेळी जवळून जात असलेल्या प्रदोष मोरे यांनी मुलांचा आरडा ओरडा ऐकला. क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी कपड्यानिशी विहिरीच्या पाण्यात उड्या मारली . प्रज्वलला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र ते त्यास वाचवू शकले नाहीत.अखेरीस सुदुंबरे येथील एनडीआरएफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले. खूप प्रयत्नानंतर प्रज्वलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यास एनडीआरएफच्या पथकास यश आले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. गवारी करीत आहेत.