पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेच्या प्रशासकीय कामकाजासाठी अधिष्ठातापदी प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. पद्माकर पंडित यांच्याकडून अधिष्ठातापदाचा कार्यभार काढून घेतला असून मानधन तत्वावरील डॉ. राजेंद्र वाबळे यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरु केल्या जाणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अधिष्ठाता पदाची नेमणूक करणे आवश्यक होते. त्याकरिता राज्य शासन सेवेतील डॉ. पद्माकर पंडीत यांची या पदावर वर्णी लावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना या पदावर मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यापुर्वी मानधन तत्त्वावर अधिष्ठाता पद भरण्याबाबत महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यावेळी मुलाखत घेऊन, डॉ. वाबळे यांची या पदाकरिता निवड करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी ते रुजू न झाल्याने या पदावर डॉ. पंडीत हेच कार्यरत होते. दरम्यान, डॉ. वाबळे यांनी या पदावर रुजू होण्याची तयारी दर्शविल्याने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी ३ मे रोजी अधिष्ठाता पदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपविला आहे. तर महापालिका वैद्यकीय विभागप्रमुख आणि विशेष कार्य अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. पंडीत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
वायसीएमएचच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश वाबळे यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 4:42 PM