पिंपरी : लष्कराच्या संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव स्कॉर्पिओ कार चालवून एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. १६) रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे एमएसईबी कार्यालयासमोर झाला.
अमोद कांबळे (वय २७, रा. भोसरी) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे, तर दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मूर्तजा अमीरभाई बोहरा (३२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी (दापोडी) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित अल्पवयीन मुलाचे वय १७ वर्षे १० महिने आहे. संशयित मुलगा मूळचा आसामचा असून, तो लष्कराच्या संस्थेत अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याचे वडील लष्करात जवान असून, आसाम येथे कार्यरत आहेत.
अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मित्राच्या स्कॉर्पिओ कारमधून भोसरीहून नाशिक फाट्याच्या दिशेने येत होता. त्याने मद्यपान केले होते. त्याच्यासमवेत त्याचा एक मित्रही कारमध्ये होता. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नव्हता. असे असताना दारू पिऊन तो भरधाव वाहन चालवीत होता.
पुणे-नाशिक महामार्गावर महावितरणच्या कार्यालयासमोर मुलाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्ता दुभाजकावर चढली आणि विरुद्ध बाजूला गेली. याचवेळी पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या रिक्षा आणि दोन दुचाकींना भरधाव कारने ठोकरले. त्यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला, तर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अल्पवयीन मुलाला बालन्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. पोलिस उपनिरीक्षक पंकज महाजन तपास करीत आहेत.