पिंपरी : दारूच्या नशेत रस्ता चुकलेल्या एकाला दगड मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार सोमवारी (दि. १३) दुपारी अडीचच्या सुमारास मावळ तालुक्यात पुसाणे गावच्या कमानीपासून पुढे दिवडकडे जाणाऱ्या रस्त्याने घडला.
संतोष प्रल्हाद सावळे (वय ३२, रा. दिवड, ता. मावळ) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १४) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रामदास लक्ष्मण साठे (रा. साठे साई, ता. मुळशी) आणि रमेश पांडुरंग चव्हाण (वय ३९, रा. पुसाणे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष सावळे हे दारुच्या नशेत होते. त्यावेळी पुसाणे गावच्या कमानीपासून पुढे दिवडकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना ते नशेत असल्याने रस्ता चुकले. त्यानंतर ते पुसाणे गावातील एका वस्तीवर कोणाच्या तरी घरी गेले. नशेत असल्याकारणाने फिर्यादी सावळे यांना काही कळाले नाही. तेव्हा त्या घरासमोर असलेल्या दोन आरोपींनी काही एक कारण नसताना फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीच्या डोक्यात, कपाळावर, भुवईच्यावर, पायाला व हाताला मारून गंभीर दुखापत केली. तसेच तोंडावर दगड फेकून मारला. त्यामुळे फिर्यादीचे वरील बाजूचे दोन व खालच्या बाजूचा जबड्याचा एक असे तीन दात तुटून ओठांना व तोंडाच्या आतील बाजूस गंभीर जखम झाली, असे फिर्यादीत नमूद आहे.