सासवड : पुरंदरमध्ये जलयुक्त शिवार अभियानात गतवर्षी चांगली कामे झाली. त्यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही. यावर्षी पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे या काळात जलसंधारणाची कामे हाती घेऊन पाण्याची पातळी वाढविण्याची आवश्यकता आहे. याकामी पुरंदर रोटरी क्लब पुढाकार घेत असून हा स्त्युत्य उपक्रम राबवीत आहे, असे प्रतिपादन तहसीलदार संजय पाटील यांनी केले. सासवडनजीक ताथेवाडी येथील ओढ्याच्या खोलीकरणाच्या कामाची सुरुवात तहसीलदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी माजी आमदार चंदुकाका जगताप, सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, पुरंदर रोटरीचे अध्यक्ष डॉ. दीपक जगताप, तलाठी बी. एन. देवकर, नगरसेवक अजित जगताप, योगेश गिरमे, रोटेरियन डॉ. प्रवीण जगताप, शशिकांत काकडे, संदीप जगताप, अनिल उरवणे आदी उपस्थित होते. रोटरी क्लबच्या वतीने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील कामासाठी ४९ लाखांचा निधी मिळाला होता. त्यामधून जलसंधारणाची कामे व वृक्षलागवड करण्यात आली. यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही, असेच काम सासवड परिसरातही व्हावे, अशी अपेक्षा तहसीलदार पाटील यांनी केली. सासवड नगर परिषदेच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नाही, असे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले. डॉ. दीपक जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पै. राजेंद्र जगताप, चंद्रकांत जगताप, दत्तात्रय जगताप यांच्यासह नागरिक उपस्थित होते. रवींद्रपंत जगताप यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
ताथेवाडीत ओढ्याचे खोलीकरण
By admin | Published: September 07, 2015 4:15 AM