लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : येथील सांगिसे पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे तुटले आहेत़ पूल मध्यभागी खचला आहे़ पिलर वरील पुलाच्या लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत़ ठिकठिकाणी पुलाला चिरा पडल्या आहेत़ मध्यभागी पूल वाकलेल्या स्थितीत असल्याने पुला पलीकडे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.कामशेत जवळील वडिवळे गावातील इंद्रायणी नदीवरील सांगिसे पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असून दरवर्षी तीन ते चार वेळा पाण्याखाली जातो. वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याबरोबर कचरा व इतर वस्तू पुलाच्या पिलरला अडकल्याने पुढे वाहणाऱ्या पाण्यास अटकाव होऊन पुलाची मागील काही वर्षांपासून दुरवस्था होऊ लागली आहे. हा पूल सहा पिलर वर उभा असून पुलाचा मध्यभाग खचला असल्याने मोठ्या पावसात हा पूल वाहून जाण्याची शक्यता जाणकार माणसांकडून वर्तवली जात आहे. २९ जूनरोजी हा पूल पाण्याखाली गेला होता. त्या वेळी पुला पलीकडील आठ गावांचा संपर्क तुटला होता. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्या पावसातही हा पाण्याखाली जातो. तसेच लोणावळ्यावरून इंद्रायणी नदी मार्गे येणारा पाण्याच्या मोठा प्रवाहासमोर गेली अनेक वर्षे हा पूल तग धरून असला तरी मागील काही वर्षांमध्ये या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. सांगिसे व इतर नदी पलीकडील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या पुला पलीकडे वडीवळे, सांगिसे, बुधवडी, वळकं, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी ही आठ महत्त्वाची गावे असून या गावांना जोडणारा हा पूल या गावांचा दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग आहे. या साकवाची रुंदी कमी असून दोन मोठी वाहने एकाच वेळी या वरून जाऊ शकत नाही. पुलाच्या संरक्षण कठड्याचे लोखंडी पाईप गंजून खराब झाले आहेत. तर कठड्यांची दुरवस्था झाली आहे. वाहनाच्या किरकोळ धडकेत कठडे तुटले आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षण भिंतींचा अभाव आहे.ग्रामस्थांनी घाबरू नयेमावळातील तीन पुलांचे सर्वेक्षण केले असून यात सांगिसे, सांगवी व सांगवडे या पुलांचा समावेश आहे. या छोट्या पुलांचे पावसाळ्यानंतर मजबुतीकरण व दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता सुभाष क्षीरसागर यांनी दिली. शिवाय कामशेत जवळील सांगिसे पुलाची काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे़ पण हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले. पावसाळा झाल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येणार आहे.मालवाहू वाहनांची वर्दळयेथील अनेक भागात फुलांच्या कंपन्या व इतर शेतीपूरक उद्योगधंदे असल्याने दैनंदिन मोठी मालवाहतूक वाहने या पुलावरून ये-जा करीत असतात. याच प्रमाणे या भागात वीटभट्ट््यांचे प्रमाण जास्त असून मोठ-मोठे ट्रक व इतर वाहनांची या पुलावरून वाहतूक सुरू असते.
सांगिसेचा पूल खचल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By admin | Published: July 07, 2017 3:27 AM