पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्याच्या कामाची मुदत जुलै २०१६ ला संपुष्टात आलेली असताना चौथ्यांदा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. या प्रकरणातील भ्रष्ट सभापती, स्थायी सदस्य व प्रशासन अधिकाऱ्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा टाटा एसीई वाहनातून गोळा करून तो मोशी कचरा डेपोत नेऊन टाकण्याच्या कामास चौथ्यांदा तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. ही मुदत ३० जूनपर्यंत देण्यात येणार आहे. त्यासाठी ५ कोटी ९९ लाख ५४ हजार ३३ रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती सभेपुढे ठेवला होता. घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोत नेऊन टाकण्याचा ८ वर्षे कालावधीचे काम दोन कंपन्यांना देण्यास स्थायी समितीने २१ फेबु्रवारीला मान्यता दिली. कचरा वाहतुकीसाठी प्रत्येक मेट्रिक टनाला १ हजार ७८० रुपये दर निश्चित केला आहे. त्यात दरवर्षी ५ टक्के वाढ केली जाणार आहे. त्यानंतर २६ जुलै २०१६ पूर्वीच्या ठेकेदारांची मुदतवाढ संपुष्टात आलेली असताना निविदा प्रक्रियेला फाटा देऊन पूर्वीच्या ठेकेदारांना ३ वेळा मुदतवाढ दिली आहे. आता पुन्हा स्थायी समिती समोर मुदतवाढीचा विषय आला होता. ही सभा तहकूब झाल्यामुळे येत्या स्थायी समिती समोर मंजुरीला आलेला आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘‘ठेकेदारांच्या मुदती संपलेल्या असताना चार-चार वेळा मुदतवाढ देण्याऐवजी निविदा प्रक्रिया का राबविली नाही. अशा प्रकारे चार-चार वेळा मुदतवाढ देणे महापालिका अधिनियमाचे उल्लंघन नाही काय, चार वेळा मुदतवाढ देण्यात आलेल्या ठेकेदारांनी कामात दिरंगाई करणे, कचºयाच्या गाडीत राडारोडा, दगड-गोटे, माती भरून कचºयाचे वजन वाढवून करदात्या नागरिकांच्या तिजोरीची लूट केली आहे.’’
कचरा मुदतवाढीचे गौडबंगाल कायम, चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 3:13 AM