तळवडे : हिंजवडीतील वाहतूककोंडीमुळे येथील कंपन्या स्थलांतराचा विचार करत असताना अाता तळवडे येथील कंपन्यांनाही अशाच पद्धतीने वाहतूककोंडीच्या समस्यांचा सामना करावा लागत अाहे. त्यामुळे तळवडे आयटी पार्कमध्ये नवीन कंपन्या येण्यास धजावत नाहीत. परिणामी येथील एमआयडीसीची इमारत पडून आहे. औद्योगिक आणि आयटी पार्कसाठी उभारण्यात आलेल्या खासगी इमारतीही अशाच वापराविना आहेत.
पिंपरी-चिंचवड परिसरात तळवडे येथे आयटी पार्क आहे. या ठिकाणी अनेक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. सध्या वीस हजार सॉफ्टवेअर अभियंते काम करीत आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातून या ठिकाणी कामासाठी येणारे कर्मचारी निगडीमार्गे येत असतात. निगडी ते तळवडे मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झालेली असते. आॅटो रिक्षा, बस यांनी संपूर्ण रस्ता व्यापलेला असतो. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसतो. पादचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.
सॉफ्टवेअर चौकात येथील सॉफ्टवेअर कंपन्यांच्या वतीने वाहतूक नियमन करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत, परंतु त्यांनाही वाहनचालक सहकार्य करीत नाहीत. यामुळे वाहतुकीचा गोंधळ होत असतो. यामुळे येथील संगणक अभियंत्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत आहेत. वाहतूककोंडीत अडकलेले अभियंते कित्येकदा एक एक किलोमीटर पायी प्रवास करत कामावर जातात. एमआयडीसीच्या वतीनेही त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तळवडे वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ वेळोवेळी पोलीस कर्मचारी नेमणूक करण्याची मागणी करीत आहेत.
याविषयी बाेलताना सिंटेल साॅफ्टेवेअरचे प्रशासकीय व्यवस्थापक जयंत काेंडे म्हणाले, तळवडे येथील सॉफ्टवेअर परिसरात असलेल्या कंपन्यांमधील कर्मचारी वाहतूक कोंडीबाबत वारंवार तक्रार करीत असतात. मात्र त्यामध्ये शासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करुन सुधारणा होईल अशी अपेक्षा असल्याने या कंपन्या येथून बाहेर पडण्याचा विचार करत नाहीत. परंतु वाहतूक कोंडीची समस्या असल्यामुळे या परिसरात कोणतीही नवीन कंपनी स्थापन करण्याचे धाडस करत नाही. या ठिकाणी बालन व पेश ग्रुपचे टॉवर, तसेच एमआयडीसीची आयटी टॉवर इमारत सुसज्ज असूनही वापराविना पडून आहेत. त्यामुळे येथील समस्या सोडविल्यास आणखी कंपन्या येऊन विकास होऊ शकतो.