रहाटणी : पालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून शहरात ठिकठिकाणी बस थांब्यावर प्रवासी शेडची उभारणी केली. मात्र याचा प्रवाशांना फायदा होतोय का, हा खरा प्रश्न आहे. पिंपळे सौदागर येथील दीपमाळा सोसायटीजवळ एकाच ठिकाणी दोन प्रवासी शेड आहेत. त्यातील एका शेडवर एका जाहिरातदाराने फ्लेक्स लावल्याने प्रवाशांना शेडमध्ये जाता येत नाही किंवा बसताही येत नाही. त्यामुळे हे शेड कोणासाठी असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यामुळे शहरात पाहावे तिकडे इच्छुकांचे या ना त्या कारणाचे फ्लेक्स दिसून येत आहेत. जागा मिळेल तिथे फ्लेक्स लावण्याची जणू स्पर्धाच लागली असे दिसून येत आहे. मात्र काही महाभागांनी तर बस थांब्याची प्रवासी शेडही सोडला नाही. जाहिरात करावी, पण ती कुठे याचीही थोडी समज पाहिजे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित समारंभाचा हा फ्लेक्स चक्क बसथांबा शेडवरच लावला असल्याने प्रवाशांना शेडमध्ये बसण्यासाठी जाताच येत नाही. आजूबाजूने आत गेलेच, तर बस आली काय व गेली काय हे दिसतच नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. हा फ्लेक्स अनेक दिवसांपासून या ठिकाणी लावण्यात आला असल्याने प्रवाशांना उन्हातच उभे राहावे लागत आहे. मात्र पालिकेचा संबंधित विभाग अशा अनधिकृत फ्लेक्सबाबत मूग गिळून गप्प का, असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे. तसेच यावर पालिकेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)
फ्लेक्समुळे बसथांबा शेड गायब
By admin | Published: January 09, 2017 2:56 AM