पिंपरी : राज्यातील विविध जिल्ह्यांतून येथे शिकण्यासाठी आलेल्या, वाल्हेकरवाडी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे दीड लाख रुपये गोळा केले. ही रक्कम त्यांनी नाम फाउंडेशनला दिली आहे.वाल्हेकरवाडी परिसरात राहणारे हे विद्यार्थी प्राधिकरणातील एका क्लासच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. दुष्काळाच्या झळा त्यांनी अनुभवल्या असल्याने या शेतकरी बांधवांसाठी काही तरी केले पाहिजे या तळमळीतून सर्वांनी एकत्र येत निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी निगडी-प्राधिकरण परिसरातील विविध महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना दुष्काळाच्या विदारक परिस्थितीची जाणीव करून दिली आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी परिसरातून दुष्काळग्रस्तांसाठी मदतफेरी काढली. सर्वसामान्य लोक, व्यापारी, फेरीवाले, विके्रते, ग्राहक अशा सर्वांच्या मदतीतून एक लाख ३६ हजार रुपये जमा झाले. विद्यार्थ्यांनी ते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’कडे तीन टप्प्यांत जमा केले. यातील अनेक विद्यार्थी कृषी पदवीधर असून, दुष्काळ आणि शेतीसंदर्भात आणखी काही वेगळ्या प्रकारे मदत करता येईल का, या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. (वा. प्र.)
दुष्काळग्रस्तांना मदत करून घडवले माणुसकीचे दर्शन
By admin | Published: October 15, 2015 12:36 AM