पिंपरी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पोलिसांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअनुषंगाने ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना ‘वर्क फ्राॅम होम’ देण्यात येणार आहे. या नवीन उपाययोजनांमुळे पोलीस बळावर मोठा परिणाम होणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर दलातील तब्बल ४०३ पोलिसांना घरूनच काम करावे लागणार आहे. यामध्ये ४८ अधिकारी आणि ३५५ कर्मचारी घरूनच काम करणार आहेत. (work from to pimpri chinchwad police force above 55 age officer)
कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढल्याने दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे शासनाकडून कडक निर्बंध लागू केले जात आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागते. त्यामुळे पोलिसांचा आणि नागरिकांचा थेट संपर्क येतो. यातून पोलिसांना देखील संसर्गाची शक्यता आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार असलेल्या पोलिसांना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना ‘वर्क फ्राॅम होम’ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सध्या अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण ३२७५ इतके मनुष्यबळ आहे. त्यात ४०३ पोलीस ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांना घरूनच काम करावे लागणार आहे. विविध गुन्ह्यांच्या तपासाची कागदपत्रे, अहवाल पूर्तता, आढावा आदी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ३५५ कर्मचाऱ्यांमध्ये ३०५ सहायक फौजदार (सहायक पोलीस उपनिरीक्षक) तर ५० हवालदार आहेत.
पोलिसांची होणार कसरत-
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत मनुष्यबळाची कमतरता आहे. असे असतानाच चारशेपेक्षा जास्त पोलिसांना घरातच थांबावे लागल्यास उर्वरित पोलिसांवर कामाचा ताण येऊ शकतो. त्यामुळे शहर पोलिसांची मोठी कसरत होणार आहे.
शहर पोलीस दलातील मनुष्यबळ-
एकूण अधिकारी - ३४५एकूण कर्मचारी - २९३०५५ वर्षांवरील जास्त वय असलेले पोलीस अधिकारी - ४८कर्मचारी - ३५५
वरिष्ठ पातळीवरून सूचना येतील त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. उच्च रक्तदाब, मधुमेह, डायलिसिस आदी आजार असलेल्या तसेच इतर आजारांवर उपचार सुरू असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. - पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त