पिंपरी : गेल्या वर्षभरामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी करण्यात येणाऱ्या खोदकामांमुळे दररोज एकाहून अधिकवेळा भूमिगत वीजवाहिनी तुटत आहे. महावितरणला यामुळे लाखो रुपयांचा तोटा होत असून, ग्राहकांना नाहक मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. वर्षभरात सव्वाचारशे ते साडेचारशे वेळा वीजवाहिनी तुटल्याची माहिती महावितरणमधील अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासन आणि महावितरणमधील विसंवादामुळे भार नियमन नसतानाही स्मार्ट सिटीमध्ये नागरिकांना विजेचा लपंडाव पाहावा लागत आहे.
गेल्या वर्षभरात पुणे शहरात विविध कामांसाठी पुणे महानगरपालिका, एमएनजीएल, दूरसंचार देणाºया कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या कंत्राटदारांनी जेसीबी आणि विविध यंत्रांद्वारे केलेल्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या गेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मन:स्ताप पद्मावती विभागातील नागरिकांना झाला आहे. या विभागअंतर्गत पद्मावती, धनकवडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कात्रज, आंबेगाव, गुलटेकडी, भवानी पेठ, गंजपेठ, सहकारनगर, बालाजीनगर असा परिसर येतो. वीजवाहिन्या तोडल्यानंतर महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारी या अनेक पोलीस ठाण्यात अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात येत असल्यामुळे पुढील कारवाईसुद्धा पोलिसांकडून होत नाही. त्यामुळे या कंत्राटदारांचे चांगले फावले आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने एप्रिल व मे महिन्यात खोदकामांना वेग येतो. याच दिवसांत विजेची मागणी अधिक असते. वाहिनी तोडल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यास भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी व्यवस्था असूनही वीजपुरवठा सुरू करता येत नाही. तसेच वेळप्रसंगी चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागते. त्यामुळे हजारो वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत होतो. काही प्रकरणांमध्ये महावितरणलाच तोडलेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे. खोदकामासाठी परवानगी मिळविल्यानंतर संबंधित विभाग व कंपन्यांचे कंत्राटदार महावितरणला कोणत्याही प्रकारची कल्पना देत नाही. थेट खोदकामास सुरुवात केली जाते. अनेकदा आवाहन करूनही, या स्थितीत बदल होत नाही. दिवसा, रात्री किंवा मध्यरात्रीनंतरही खोदकाम केले जाते. त्यामुळे, केव्हाही वीजवाहिनी तुटून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येत आहे.महावितरणचे दुहेरी नुकसानपुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून खोदकामाची परवानगी घेतल्यानंतर संबंधित विभाग अथवा कंत्राटदारांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयास कळविल्यास वीजवाहिन्यांना धोका होणार नाही, याची काळजी महावितरणकडून घेण्यात येऊ शकते. मात्र, महावितरणने, अनेकदा सांगूनही खोदकामाबाबत पूर्वसूचना दिली जात नाही. दुर्दैवाने पावसाळापूर्व कामे एप्रिल-मे महिन्यातच होतात. उन्हाळ््यात मागणी जास्त असल्याने भारव्यवस्थापन शक्य होत नाही. परिणामी ग्राहकच नाहक वेठीस धरले जातात. वीजपुरवठा खंडित झाल्यास, खंडित काळातील वीज बिलास महावितरणला मुकावे लागते. हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित असल्याने ते नुकसान लाखोंमध्ये होते. याशिवाय विकत घेतलेल्या विजेचा पुरवठा शंभर टक्के होत नाही. तसेच, प्रत्येक वेळी शंभर टक्के बिलवसुली होत नसल्याने या नुकसानीची तीव्रता आणखी वाढते.