पिंपरी : महापालिका शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळा आणि महापालिका हद्दीतील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी सर्व माध्यमांच्या शाळांचा कार्यक्रम प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी जाहीर केला. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात एकूण ७६ सुट्या निश्चित केल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शैक्षणिक सत्रात ३६५ दिवसांपैकी किमान २३७ दिवस शैक्षणिक कार्य झाले पाहिजे, असा नियम आहे. त्यानुसार ३६५ दिवसांत ५२ रविवार, १८ सार्वजनिक सुट्या, ३४ दिवस उन्हाळी सुट्या, १३ दिवस दिवाळी, नऊ वैकल्पिक सुट्या आणि विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीतील दोन सुट्या अशा एकूण १२८ सुट्यांचे दिवस आहेत. त्यात या वर्षात कमाल १२ किरकोळ रजा घेता येतील. मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांना वैकल्पिक अशा १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत, २० मार्चला होळी, २३ मार्चला तुकाराम बीज, १२ जुलैला आषाढी एकादशी, ५ आॅगस्टला नागपंचमी, २४ आॅगस्टला गोपाळकाला, ७ सप्टेंबरला गौरी विसर्जन, २२ नोव्हेंबरला आळंदी यात्रा; तर ११ डिसेंबरला श्री दत्तजयंती अशा वैकल्पिक सुट्या मिळणार आहेत़ तर सहा सप्टेंबरला गौरी पूजा आणि १२ सप्टेंबरला अनंत चतुर्थी, विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीतील दोन दिवस स्थानिक सुट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. उन्हाळी सुटी ७ मे ते १४ जूनपर्यंत राहील.४यंदा दिवाळीची सुटी २६ आॅक्टोबरपासून सुरू होत असून, नऊ नोव्हेंबरपर्यंत देण्याचा निर्णय शाळा प्रशासनातर्फे घेण्यात आला. या वर्षात २३७ दिवस शाळा कामकाजांचे असून, वर्षातील ५२ रविवार धरून एकूण १२८ सुट्या शिक्षकांना मिळणार आहेत. दरम्यान, दरवर्षी दिवाळीची वीस दिवस असलेली सुटी यंदा तेरा दिवस आहे. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.