पिंपरी : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चिंचवडगावात आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेच्या वेळी टोळक्याने वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक केली. तसेच फुगेवाडी परिसरात पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. या दोन्ही घटना रविवारी सकाळी ११च्या सुमारास घडल्या. चिखलीत दुकाने बंद ठेवण्यात आली.रविवारी सकाळपासूनच सोशल मीडियावरून पिंपरी-चिंचवड बंद असल्याचे मेसेज व्हायरल झाले होते. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चिंचवडगावात मराठा समाजाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये बँकेच्या एमटीएमचे आणि दुचाकीच्या शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुगेवाडीत पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. सुटीच्या दिवशी अचानकपणे झालेल्या या दोन हिंसक घटनांमुळे शहरात असुरक्षिततेचे वातावरणआहे. या घटनांमुळे शहरात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.चिंचवड येथील सभेस मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी हत्याकांडात दोषी असलेल्या नराधमांना त्वरित फाशी देण्यात यावी व समान नागरी कायदा करावा, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली.शहाजी भोसले, यशवंत कर्डिले, नगरसेवक अश्विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, बाळासाहेब ओहाळ, माजी नगरसेवक राजू गोलांडे, दत्तात्रय चिंचवडे, सूरज भोईर, अश्विनी बांगर, राजेंद्र चिंचवडे, शेखर चिंचवडे, नीलेश मरळ, शैलेश गावडे, संदीप चिंचवडे, विजया भोईर, योगेश चिंचवडे, हेमंत डांगे, आशिष गावडे, सुजाता काटे, स्मिता भोसले, ज्योती हिंगे आदी या वेळी उपस्थित होते.नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक व शासकीय नोकरीत आरक्षण मिळावे, राज्यातील अन्य समाजांप्रमाणे मराठा समाजातील मोठा वर्ग आजही उपेक्षित आहे. सब का साथ, सब का विकास या ब्रीदवाक्याला धरून मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे, असे ओव्हाळ यांनी म्हटले आहे.तळवडे : बंद, ‘रास्ता रोको’तळवडे : तळवडे गावातील ग्रामस्थांनी तळवडे गावठाण चौकात शोकसभा घेत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली. व्यावसायिकांनी या वेळी दुकाने बंद ठेवली होती. तरुणांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या वेळी तळवडे ते देहू, निगडी ते तळवडे, चिखली ते तळवडे या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. बंद मागे घेतल्याचे समजताच तरुणांनी वाहनांना मार्ग मोकळा करुन दिला.चिंचवडला निषेध सभाचिंचवड : चिंचवडगावातील चापेकर चौकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवडमधील सकल मराठा समाजाच्या वतीने चापेकर चौकात विविध मागण्यांसाठी रविवारी घोषणाबाजी केली. आमच्या विविध मागण्यांबाबत शासन स्तरावर निर्णय होत नसल्याने आम्ही समाजबांधव विविध प्रकारे आमच्या मागण्या मांडत आहोत. याचाच एक भाग म्हणून चिंचवडगावातील चापेकर चौकात सकाळी दहाला सर्व समाजबांधवांनी एकत्रित येत आपले विचार व्यक्त केले.बंदला रावेतमध्ये प्रतिसादरावेत : पिंपरी- चिंचवड बंदला रावेत, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, बळवंतनगर, छत्रपती शिवाजी चौक, चिंतामणी चौक, चिंचवडे नगर येथील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठा समाजाच्या मागणीस विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीही पाठिंबा व्यक्त करत रविवारी सकाळी पुकारलेल्या बंदला आपला पाठिंबा दिला. अत्यावश्यक सेवा वगळता जवळपास शंभर टक्के व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. बंदमुळे येथील व्यापारी पेठेमध्ये शुकशुकाट होता. सकाळी नऊच्या सुमारास सकल मराठा समाज, विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या वतीने व्यावसायिकांना बंद पाळण्यासाठी शांततेत आवाहन केले जात होते.पोलिसांचा चोख बंदोबस्तआंदोलकांनी राज्य शासनाचा निषेध केला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिंचवड आणि देहूरोड पोलीस स्टेशनने परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी वास्तव्यास आहेत. मराठा मोर्चा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीच्या मोर्चाचे आम्ही समर्थन करतो. आम्ही एक दिवसाचा उपवास करून या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत, अशी प्रतिक्रिया येथील अनेक विद्यार्थ्यांनी दिली. या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद; चिखलीत दुकाने बंद, पिंपरी परिसरातही बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 5:00 AM