भोसरी : मागील आठवडाभर पडणाऱ्या श्रावण सरींमुळे भोसरी व परिसरातील रस्त्यांची धूळधाण उडाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने आता अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांसह औद्योगिक परिसरातील खड्डे बुजवण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.
भोसरी, मोशी, चºहोली, वडमुखवाडी भागातील अंतर्गत रस्त्यांची सतत पडणाºया पावसामुळे दुरवस्था झाली आहे. समाविष्ट गावे, औद्योेगिक परिसरातील अनेक रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी साधी खडी, मुरुम पडला नाही. त्यामुळे पावसामुळे हे रस्ते चिखलमय झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी छोटे अन् मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांचा अंदाज घेत वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. बहुसंख्य रस्त्यांवर जलवाहिनी, विद्युतवाहिनी, केबल आदी टाकण्याच्या कामासाठी खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये रस्ते विकासाचे काम महापालिकेने हाती घेतले असले, तरी पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. सध्या तरी या भागामधील अनेक रस्ते अद्याप कच्चा स्वरूपाचे आहेत. रस्त्यांचे रुंदीकरणदेखील झालेले नाही. रस्त्यावर सध्या मोठे खड्डे पडल्याने वाहन चालविताना वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. काही भागात धोकादायक ठरणारे स्पीड ब्रेकर महापालिकेने ‘खरडून’ काढले आहे. हे काम व्यवस्थित न झाल्याने वाहनचालकांना त्यावरून जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.
औद्योगिक परिसरातील अवजड वाहतुकीमुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. कामगारही खड्डयांमुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. भोसरी औद्योेगिक भागातील मुख्य रस्त्यांवर ठीकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने रस्त्यावर खड्डे की खड्डयांत रस्ता असा प्रश्न कामगारांना पडला आहे. भोसरी एमआयडीसी भागात छोटे-मोठे अपघात वाढण्यामागे रस्त्यांना पडलेले खड्डे प्रामुख्याने कारणीभूत आहेत. दर वर्षी अब्जावधीचा महसूल प्राप्त करून देणाºया औद्योगिक वसाहतीला साधे सुसज्ज व सुरक्षित रस्ते मिळू न शकल्याची खंत कामगार वर्गातून व्यक्त केली जात आहे.४पिंपळे सौदागर : पावसामुळे नागरिकांना होणार त्रास, त्यातच खराब रस्त्यांमुळे रोज करावी लागणारी कसरत, यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत. ‘रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यांत रस्ते आहेत’ हे समजत नाही़ येथील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत़ या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
परिसरातील विकसित न करण्यात आलेले रस्ते व व्यवस्थित न केलेले काम यामुळे येथील लोकांना रोज हा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या दिवसांत रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला यांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. तर काही नागरिकांचा अपघात होऊन जखमी झाले आहेत. याकडे पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन व अधिकारी वारंवार तक्रार करूनदेखील डोळेझाक करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करीत आहेत. पिंपळे सौदागर येथील सुखवाणी लॉन ते ट्रायॉस सोसायटी, झुलेलाल सोसायटी तसेच पी़ के़ चौक ते जरवरी सोसायटी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे़ अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही याकडे अधिकारी, काणाडोळा करीत असल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत़ या जीवघेण्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत़