पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेमुळे घरबचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.पुण्यातील एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. त्या अनुषंगाने घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने पंतप्रधानांना रिंग रोड बधितांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेने दिली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर विभाग सतर्क झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी आज सकाळी समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांना ताब्यात घेतले.विजय पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून घर बचाव संघर्ष समिती हक्काच्या घरांसाठी संघर्ष करीत आहे. गुरुद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी या उपनगरातील साडेतीन हजार घरे नियोजित मंजुरी नसलेल्या एचसीएमटीआर प्रकल्पामुळे बाधित होत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत २८ किमी व पुणे महापालिका हद्दीत ३६ किमी चा सदरचा एचसीएमटीआर रस्ता नियोजित आहे. दोनही महापालिका हद्दीतील नियोजित प्रकल्पाकरिता सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधानांनी याबाबत लक्ष घालावे असे समितीचे मत असून त्याबाबत आम्हाला निवेदन द्यायचे होते. मात्र, पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे घरबचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 8:03 PM
गेल्या अडीच वर्षांपासून घर बचाव संघर्ष समिती हक्काच्या घरांसाठी संघर्ष सुरु..
ठळक मुद्देदोनही महापालिका हद्दीतील नियोजित प्रकल्पाकरिता सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित